नाहर एल बरेद (लेबेनान) – शरणार्थ्यांची बोट बुडून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान 89 जणांना जलसमाधी मिळाल्याची घटना लेबेनानजवळ घडली आहे. सीरियाच्या किनाऱ्याजवळ शरणार्थ्यांची ही बोट बुडाली होती. ( 89 dead in Lebanon migrant shipwreck off Syria) हे शरणार्थी लेबेनानमधून युरोपात स्थलांतर करण्यासाठी या बोटीतून प्रवास करत होते. या शरणार्थ्यांपैकी काही जणांनी यापूर्वीही भूमध्य समुद्रातून युरोपात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश आले नव्हते.
या बोटीतील मृतांचा आकडा पूर्वी 77 सांगण्यात आला होता. मात्र नंतर अधिक मृतदेह सापडल्यामुळे मृतांचा आकडा 89 वर पोहोचला आहे. या बोटीच्या मालकाला लेबेनानच्या सैन्याने ताब्यात घेतले आहे. या बोटीमध्ये लेबेनान, सीरिया आणि पॅलेस्टाईनमधील शरणार्थ्यांचा समावेश होता.
यापैकी सीरियाचे 12, लेबेनानचे 5 आणि पॅलेस्टाईनच्या तिघांचे मृतदेह लेबेनानमध्ये आणण्यात आले आहेत. आतापर्यंत 31 मृतदेह लेबेनानच्या किनाऱ्यावर आणण्यात आले आहेत. तर उर्वरित मृतदेह सीरियाच्या नाविकदलाने समुद्रातून बाहेर काढले आहेत. ही बोट बुधवारी बुडाली होती. ही बोट सागरी चाच्यांच्या हल्ल्यात बुडाल्याचा प्राथमिक संशय होता.