पुणे – “कॅफे कॉफी डे’चे व्यवस्थापकीय संचालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. “कॅफे कॉफी डे’ची पुण्यात तब्बल 87 आउटलेट आहेत. त्यातील काही ठिकाणी भेट दिली असता, यातील कामकाजावर कसलाही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. आउटलेट कंपनी चालविते. यामध्ये फ्रॅंचायजीचा सहभाग नसल्याचे सांगण्यात आले.
आउटलेटमधील काही कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. त्याचबरोबर सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करीत होते. सिद्धार्थ यांनी पुण्याला अनेकदा भेट दिलेली आहे. त्यावेळी काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी बोलणी केली होती. त्यावेळेस ते अतिशय साधे गृहस्थ होते, असे जाणवल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. “कॅफे कॉफी डे’त येणाऱ्या नियमित ग्राहकांवर कसलाही परिणाम झालेला नाही. त्यांनी या घटनाक्रमाबाबत विचारणा केली का? असे विचारले असता काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “काही ग्राहकांनी याबाबत विचारणा केली. त्याचबरोबर ग्राहकांनीही दुःख व्यक्त केले. मात्र या आऊटलेटच्या कामकाजावर परिणाम होणार नाही. आगामी काळात कामकाज सुरू राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कर्मचारी म्हणतात…
“कॅफे कॉफी डे’च्या कर्मचाऱ्यांनी सिद्धार्थ यांच्याबद्दल सांगितले, “सिद्धार्थ वेळोवेळी पुण्याला येऊन कामकाजाचा आढावा घेत असत. सहा-सात महिन्यांपूर्वी नळस्टॉप येथील कॅफे कॉफी डे मध्ये ते अचानक आले. त्यांनी काही मिनिटे पाहणी केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना क्षेमकुशल विचारले आणि ते निघून गेले. वर्षभरापूर्वी त्यांनी अचानक सेनापती बापट रस्त्यावरील “कॅफे कॉफी डे’ला भेट दिली होती.’