गुड न्यूज : वर्षाखेरीस भारतात तयार होणार सर्वाधिक परिणामकारकता असलेल्या लसीचे ८५ कोटी डोस

नवी दिल्ली ( sputnik v vaccine in india ) – देशासाठी करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट प्रचंड हानिकारक ठरली आहे. भारताने दररोज वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येमध्ये जगभरातील सर्व देशांना मागे सोडत नकोसा विक्रम आपल्या नावे करून घेतला आहे. बाधितांच्या संख्येसोबतच करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा देखील धडकी भरवणारा आहे.

दरम्यान, दुसरी लाट सुरु असतानाच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली असून तिचा दाह कमी करण्यासाठी लसीकरण मोहिमेस वेग द्यावा अशी सूचना केली आहे.

लसीकरण मोहिमेला वेग देणे महत्वाचे बनले असतानाच अनेक राज्यांना सध्या लसींचा तुटवडा जाणवतो आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देता यावा यासाठी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात लसींचा तुटवडा भासत असतानाच आज एक सुखद बातमी आली असून रशियामध्ये विकसित करण्यात आलेल्या स्पुतनिक V या लसीचा पहिला डोस आज हैद्राबाद येथे  देण्यात आला. या लसीचा हा देशातील पहिला डोस ठरला. स्पुतनिकच्या आगमनाने भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येईल असा अंदाज वर्तवण्यात येत असतानाच रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीव यांनी आणखी एक गुड न्यूज दिली आहे.

दिमित्रीव यांनी स्पुतनिक लसीबाबत बोलताना, “ही एक रशिया-भारत बनावटीची लस आहे. या लसीच्या एकूण उत्पादनापैकी मोठा भाग भारतात बनवला जाईल. वर्षाखेरीस आम्ही या लसीचे ८५ कोटी डोस बनवू असा आम्हाला विश्वास आहे. तसेच स्पुतनिक लाईट ही लस देखील लवकरच भारतात उपलब्ध करण्यात येईल.” अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, आज भारतामध्ये स्पुतनिक v या लसीचा पहिला डॉस हैद्राबाद येथे दीपक सापरा यांना देण्यात आला. ते डॉक्टर रेड्डीज लॅबचे उच्चपदस्थ अधिकारी आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.