नगर -करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात शहरात अडकलेल्या स्थलांतरित मजूरांना केडगाव येथील बॉस्को ग्रामीण विकास केंद्राने निवारागृह उपलब्ध करुन दिला होता. नुकतेच दुसऱ्या टप्प्यातील येथील 84 स्थलांतरित मजूरांना छत्तीसगड व बेळगावला एसटी महामंडळ व खाजगी बसने पाठविण्यात आले.
या संकट काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये केडगाव येथील बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात केंद्राचे संचालक फादर जॉर्ज दिऍब्रिओ व ब्रदर विन्सेंट निग्रेल यांच्या मार्गदर्शनाखाली दीड महिन्यापासून निवारागृह चालविण्यात आला. यामध्ये स्थलांतरित मजूरांच्या खाण्या-पिण्यासह आरोग्याची देखील काळजी घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात काही दिवसांपूर्वी मजूरांना खाजगी बसने उत्तर प्रदेशला पाठविण्यात आले होते. तर नुकतेच दुसऱ्या टप्प्यात छत्तीसगड येथील 72 परप्रांतीय बांधकाम मजूरांना एसटी महामंडळाच्या तीन बसने तर 10 बेळगाव तर 2 गोरखपूर येथील मजूरांना खाजगी बसने पाठविण्यात आले.
बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या पाहुणचाराने परप्रांतीय भारावले. जाताना त्यांचे डोळे भरुन आले होते. येथील निवारगृहाने माणुसकीच्या वागणुकीने सर्वांची मने जिंकली. बॉस्को ग्रामीण विकास केंद्र खरोखरच वंचितांचे आधार केंद्र असल्याची भावना मजूरांनी जाताना व्यक्त केली. या मजूरांना मोटार वाहन निरीक्षक संजय माने, सहा.मोटार वाहन निरीक्षक जागृती फटांगरे, राकेश जगताप यांनी प्रशासकीय पातळीवर मंजूरी घेण्यासाठी तर तीन एसटी बस उपलब्ध करुन देण्यासाठी विभाग नियंत्रक विजय गीते यांनी मदत केली. या सर्वांच्या आरोग्य तपासणीसाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. गिरीश दळवी व त्यांच्या टीमने सहकार्य केले. गोरखपूरला दोन मजूरांना पाठविण्यासाठी महापालिकेचे निलेश शिंदे व नानासाहेब गोसावी यांचे देखील सहकार्य लाभले.