पुणे – महापालिकेच्या शाळांमधील मुलांच्या बॅंक खात्यात अखेर “डीबीटी’ योजनेद्वारे पैसे पाठवण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे. आतापर्यंत 80 हजार विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. आता शैक्षणिक सत्र सुरू झाल्याच्या तीन महिन्यांनंतर या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करता येणार आहे.
महापालिकेने 2017 पासून शालेय साहित्य खरेदी बंद करून याची निविदा प्रक्रिया न काढता हे पैसे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये दप्तर, गणवेश, वह्या, पुस्तके, स्वेटर, बूट, मोजे यासह इतर साहित्यांचा समावेश आहे. हे पैसे जुलै-ऑगस्टमध्ये मिळणे आवश्यक आहे. पण, भांडार विभागाला वस्तूंचे दर निश्चित करण्यास व शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यास झालेल्या विलंबामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे जमा होण्यासाठी विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागली आहे.
महापालिकेने सन 2019-20 पर्यंत हे पैसे नियमित दिले. मात्र, 2020-21, 2021-22 या दोन वर्षांत करोनामुळे ही रक्कम मुलांना देण्यात आली नाही. तर मागील वर्षी मुलांची संख्या घटली होती. मात्र, यावर्षी पुन्हा मुलांची पटसंख्या वाढली असल्याने सुमारे 93 हजार मुलांसाठी 39 कोटी 55 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती.
“प्रभात’तर्फे पाठपुरावा
शाळा सुरू झाल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने मुलांना जुने गणवेश आणि जुनेच शैक्षणिक साहित्य वापरावे लागत आहे, ही बाब दैनिक “प्रभात’ने सातत्याने मांडली होती. अखेर पालिका प्रशासनाने या विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करणे सुरू केले आहे. आणखी 13 हजार मुलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे काम सुरू आहे. हे काम पुढील दोन ते तीन दिवसात पूर्ण केले जाणार आहे.