सुशोभीकरणासाठी आठ कोटी

दीड किलोमीटरचा रस्ता
मोरया मंदिर ते थेरगाव बोटक्‍लबपर्यंतचा परिसर 

पिंपरी  – चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा, चापेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी मंदिरापासून थेरगाव बोट क्‍लबपर्यंतचा सुमारे दीड किलोमीटर परिसराच्या सुशोभिकरणासाठी तब्बल आठ कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये नेमके काय केले जाणार याबाबत स्पष्टता नसल्याने करदात्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर आणि मंगलमूर्ती वाडा या स्थळांना धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. हजारोंच्या संख्येने भाविक दररोज मोरया गोसावी समाधी मंदिरात दर्शनासाठी येतात. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात चिंचवड येथील दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या एकाच चापेकर कुटुंबातील तीन भावंडांनी बलिदान दिले. हाच देशाभिमान, चापेकर बंधूंचे कार्य नव्या पिढीसमोर यावे, त्यांचा स्फूर्तीदायी इतिहास चिरंतन राहो, यासाठी चिंचवडगावात शिल्पसमूह उभारण्यात आले आहे. क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या स्मृती योग्य रितीने जतन व्हाव्यात, उद्याच्या पिढीला त्यांच्या कार्याचे महत्व समजावे, यासाठी हे शिल्पसमूह महत्त्वपूर्ण ठरत आहे. थेरगाव बोट क्‍लब येथे केजूबाई बंधारा हा निसर्गरम्य परिसर आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.

पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे आता चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा, चापेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी मंदिरापासून थेरगाव बोट क्‍लबपर्यंतच्या सुमारे दीड किलोमीटर परिसराचे सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी 9 कोटी 31 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. तीन ठेकेदारांनी यामध्ये भाग घेत निविदा सादर केल्या.

त्यापैकी एच. सी. कटारीया या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 15 टक्के कमी दर सादर केला. त्यानुसार 7 कोटी 71 लाख रूपये अधिक 18 लाख 64 हजार रूपये रॉयल्टी चार्जेस आणि 5 लाख रूपये मटेरियल टेस्टींग शुल्क असे एकूण 7 कोटी 95 लाख रूपये या सुशोभिकरणासाठी खर्च होणार आहे. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी 15 जून रोजी निविदा स्विकारण्यास मान्यता दिली. त्यानुसार, हा विषय उद्या (बुधवारी) होणाऱ्या स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला आहे.

नाट्यगृहाच्या सुशोभिकरणासाठी 23 कोटी 

महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथे नाट्यगृह उभारण्यात येत आहे. या नाट्यगृहाची अंतर्गत सजावट व बाह्य सुशोभिकरणासाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली होती. त्यात पात्र ठरलेले एम. आर. गंगाणी या ठेकेदार कंपनीकडून हे काम करुन घेण्यात येणार आहे. तब्बल 23 कोटी रुपयांचा खर्च महापालिका या कामावर करणार आहे. सुशोभिकरणाच्या नावाखाली सुरु असलेली महापालिकेची कोटीच्या कोटी उड्डाणे पाहून करदाते आश्‍चर्याने तोंडात बोट घालत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×