शेतकरी अपघात विम्यात कुटुंबातील एकाचा समावेश

पुणे – राज्यभरातील शेतकऱ्यांना लागू केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती राज्य सरकारने वाढविली आहे. या विमा योजनेत शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शेती व्यवसाय करताना झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नव्हती. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ही योजना लागू केली आहे. त्यानुसार या शेतकऱ्यांना 2 लाखांची नुकसान भरपाई दिली जाते. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होत असला तरीदेखील त्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचा शेती करताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याला कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नव्हती. त्यामुळे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला ही योजना लागू करण्याची मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधींकडून होत होती.

त्यानुसार योजनेत शेतकऱ्याच्या एका कुटुंबातील सदस्याचा समावेश करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत कृषी गणनेच्या उपलब्ध माहितीनुसार 1.52 कोटी शेतकऱ्यांना ही योजना लागू करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश केल्याने विमा लागू असलेल्या शेतकऱ्यांची संख्या 3.04 कोटींवर पोहोचली आहे. पात्र, शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. याशिवाय हात, पाय अथवा डोळा गमावल्यासदेखील ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ही रक्‍कम राज्य सरकार विमा कंपनीला देणार आहे. राज्य सरकारच्या अन्य विमा योजनेत शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यास या योजनेसाठी शेतकरी अपात्र ठरणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.