पर्यटनमंत्र्यांची मान्यता : एक हजार कोटींचा निधी मिळणार
पिंपरी – मोशी येथे सिंगापूर मधील सेन्टोसा पार्कच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे “सफारी पार्क’ साकारण्यास राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज (दि. 3) मुंबई येथे झालेल्या बैठकीत मान्यता दिली. सुमारे दीड हजार कोटींच्या या उद्यानासाठी एफडीआयच्या माध्यमातून एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका व एमटीडीसीच्या माध्यमातून प्रकल्प साकारण्यात येणार असून त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित असल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने मोशीतील प्रस्तावित सफारी पार्कबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सफारी पार्क साकारण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार महेश लांडगे यांच्यासह शासनाच्या पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल, पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापालिकेच्या नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक रा. म. पवार यांच्यासह पर्यटन विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
पर्यटनमंत्री रावल म्हणाले, मोशीतील सफारी पार्कची आरक्षित जागा तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. सेन्टोसा पार्कच्या धर्तीवर सफारी पार्क साकारण्यात यावा. त्यासाठी तातडीने एफडीआयच्या माध्यमातून एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल. उर्वरित निधी राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात यावा. या पार्कसाठी पर्यटन विभाग निधीची कमतरता भासू देणार नाही. सफारी पार्कचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने सादर करावा. त्याला तत्काळ मान्यता देण्यात येईल. त्यानंतर सफारी पार्क साकारण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश पर्यटनमंत्री रावल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसाठी ही आनंदाची बाब आहे. “सफारी पार्क’ मुळे समाविष्ट गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यासाठी विदेशी कंपन्या एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून तीन वर्षात सफारी पार्क पूर्ण होईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि पिंपरी महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सफारी पार्क साकारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मोशीकरांना बाप्पा पावला
मोशी येथील नियोजित सफारी पार्कच्या जागी पुणे महापालिकेचा कचरा डेपो करण्याचा घाट घातला होता. आमदार महेश लांडगे यांच्यासह स्थानिक नागरिकांचा विरोध होता. मात्र, याजागी सफारी पार्क साकारण्यास पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे मोशीकरांची पुण्याच्या कचऱ्यापासून सुटका झाली आहे. मोशीकरांना बाप्पा पावल्याची चर्चा रंगली आहे. सफारी पार्कमुळे या भागातील उद्योग-व्यवसायाची वृद्धी होणार आहे. तसेच, स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होतील, असा दावा आमदार लांडगे यांनी केला आहे.