सीबीआयकडून गुन्हा दाखल
नवी दिल्ली – कर्ज मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून स्टेट बॅंक ऑफ इंडियाची 70 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल मुंबईस्थित लिव्हवेल एअर टीम प्रा. लि. या कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. कंपनीने मिळवलेल्या या कर्जाची परतफेड झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सीबीआयने आपल्या “एफआयआर’मध्ये अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माणक डावर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बुर्झिन डावर यांच्यासह कंपनीला आरोपी म्हटले आहे. 2015 ते 2017 या काळात कंपनी आणि कंपनीच्या संचालकांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी कट रचला असा आरोप “सीबीआय’ने केला आहे.
भारत सोडून ब्रिटन, युएई, मलेशिया आणि सिंगापूर या पाच देशांमध्ये या कंपनीचे धागेदोरे सापडले आहेत. 2010 मध्ये दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 येथे एअरबसच्या “ए 380’या सर्वात मोठ्या एअरक्राफ्टच्या ग्राउंड हॅंडलिंगची जबाबदारी या कंपनीवर सोपवण्यात आली होती. कंपनीने अर्थसहाय्य व 61 कोटी रुपयांची क्रेडिट सुविधा मिळवण्यासाठी बॅंकेत सादर केलेल्या आर्थिक निवेदनात एका लेखापरीक्षकाच्या स्वाक्षऱ्यांसह बनावट कागदपत्रे जोडली आहेत, असल्याचेही सीबीआयने म्हटले आहे.
आर्थिक अनियमितता आणि फसवणूक आढळल्याने “एसबीआय’ने स्टॉक ऑडिट करण्यासाठी ऑडिटरची नेमणूक केली. त्यावर संजय झा आणि असोसिएटसनी आपले लेखापरीक्षक केले होते, असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. मात्र आपण या कंपनीचे लेखापरिक्षण केले नसल्याचे संजय झा आणि असोसिएटस यांनी “एसबीआय’ला कळवले. त्यानंतर “एसबीआय’ने कंपनीविरोधात “एफआयआर’दाखल केली.