विकासकामांची पोचपावती जनता मतदानातून देईल

शिवेंद्रसिंहराजे; भाजपच्या प्रचाराला साताऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा  –
निवडणूक आली की काही जणांच्या अंगात आमदारकीचं भूत संचारतं. पाच वर्षात काम करायचं सोडा, पण फिरकायलाही यांना फुरसत नसते. सातारा शहर, तालुका आणि जावळी तालुक्‍यात माझ्या माध्यमातून शेकडो कोटींची विकासकामे झाली आहेत.

आम्ही केलेल्या कामांची पोचपावती जनतेने मतदानातून द्यावी, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले व सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रचारार्थ बुधवारी सातारा शहरात काढण्यात आलेल्या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळला.

शाहू चौकात (नगरपालिका) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांना उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर पदयात्रेला प्रारंभ झाला. कुंभारवाडा, आयडीबीआय बॅंक, शिक्षक बॅंक, तहसील कार्यालय, भाजी मंडई, सैनिक कॉलनी, चांभार वस्ती, वडार वस्ती, ओम सुंदर फोटो, आंबेकर दुकान, श्रीनाथ मंदिर चौक, लकी आर्टस्‌, पावन हनुमान मंदिर, मल्हार पेठ, जगताप कॉलनी, ऍक्‍सिस बॅंक, भोसले मळा, कर्मवीर सोसायटी, सेनॉर चौक, मल्हार पेठ, तपासे गल्ली, पोलीस ठाणे, मुरलीधर भोसले ते दीपलक्ष्मी नाईक घर असा पदयात्रेचा मार्ग होता. नागरिकांशी सवांद साधून शिवेंद्रराजे यांनी भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले.

पदयात्रेत नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, नगरसेवक अशोक मोने, धनंजय जांभळे, अमोल मोहिते, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, श्रीकांत आंबेकर, राम हादगे, बाळासाहेब खंदारे, दीपलक्ष्मी नाईक, भाऊ पाटोळे, सविता फाळके, सतीश जाधव, हेमा तपासे, प्रकाश बडेकर, बाळासाहेब नाईक, अनिता घोरपडे, अशोक जाधव, योगेश चोरगे, शिंगरे, आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. फटाक्‍यांची आतषबाजी करत दोन्ही उमेदवारांचा जयघोष करण्यात आला.

नागरिकांनी चौकाचौकात फुलांचा वर्षाव करून दोघांचे उत्स्फूर्त स्वागत केले. महिलांनी औक्षण केले. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा-जावळी मतदारसंघात यापुढे भाजप सरकारच्या माध्यमातून विकास गतिमान करणार आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका.

आजच्या पदयात्रेचा मार्ग
उद्या, दि. 10 रोजी सकाळी 7 वाजता अदालत वाडा येथून पदयात्रा सुरू होणार आहे. तेथून वाघाची नळी, देवी चौक, कमानी हौद, कूपर कारखाना, ऍड. पिसाळ घर, ठोंबरे घर, शिंदे गल्ली, घोरपडे वखार, शाहू चौक ते चार भिंती या मार्गावर पदयात्रा निघणार आहे. सायंकाळी 6 वाजता काशी विश्‍वेश्‍वर चौक आणि रात्री 8 वाजता अरुण टेलर, पुणेकर घराजवळ कोपरा सभा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.