परतीच्या पावसाने 70 टक्के पिकांचे नुकसान

पाटण तालुक्‍यातील स्थिती; मदतीची प्रतीक्षा

पाटण  – पाटण तालुक्‍यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामातील भात, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. तालुक्‍यातील साधारणत: 70 टक्के नुकसान परतीच्या पावसाने झाले आहे.

यावेळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने याअगोदर पडलेल्या पावसामुळे पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. सतत पडणारा पाऊस व पुराच्या पाण्याचा फटका शेतीला बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले होते. त्यातच गेल्या महिनाभरापासून पडणाऱ्या परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडवला आहे. काढणीयोग्य झालेली पिके शेतकऱ्यांना पावसामुळे काढता आलेली नाहीत. शेतातच या पिकांचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्‍यात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग व ज्वारीची लागण करण्यात येते.

तालुक्‍यातील शेती पावसावर अवलंबून असल्याने पिकांवर शेतकऱ्यांचा जोर असतो. त्यामुळे या पिकांवर शेतकरी अवलंबून असतो. मात्र ऑगस्ट महिन्यात पूरस्थितीमुळे पिकांचे झालेले नुकसान त्यातच परतीच्या पावसाने शेतीचे झालेले नुकसान यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरक्ष: कंबरडे मोडले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यावर तेवढेच पीक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही दिवसभर उघडीप दिलेला पाऊस सायंकाळी बरसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दैना होताना दिसत आहे.

तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात पेरणीची तसेच लागण्याची भात शेती शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येते. साधारणत: 90 ते 110 दिवसांची असणारी भातपिकांची काढणी पूर्णपणे झाली आहे. मात्र या पिकांना 140 ते 160 दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊनही ही पिके शेतात उभी आहेत. काढणीला आलेली पिके परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना काढता येत नाहीत. परिणामी पावसामुळे भात पिकांचे शेतातच मोठे नुकसान होत आहे.

पावसामुळे उभी असणारी पिके आडवी झाल्याने या प्रकरणात पुन्हा फुटवे येऊ लागले आहेत. तर सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडल्या आहेत. त्यामुळे सलग पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीनला केवळ पाने उरली आहेत. पावसामुळे शेंगा झडून गेल्या आहेत. तर ज्वारी पिकाची अवस्था गंभीर आहे. ज्वारीची कणसे सततच्या पावसाने काळी पडू लागली आहेत. तर ज्वारीलाही कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेली ही पिके परतीच्या पावसाने अक्षरशः वाया गेली आहेत. त्यामुळे सुरुवातीला पुराच्या पाण्यामुळे व आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

तालुक्‍यात नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. यासाठी महसूल विभागाचे तलाठी, ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यक या यंत्रणा शेतीचे पंचनामे करण्यासाठी कामाला लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्यांचे बॅंक पासबुक, आधार कार्ड व फोटो ही कागदपत्रे अर्जासोबत घेऊन या यंत्रणेला सहकार्य करावे.

अविनाश मोरे, पाटण तालुका, कृषी अधिकारी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.