आळंदी – श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ, जगदंब प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (10 ऑगस्ट) शिक्षणमहर्षी विलासराव तांबे शैक्षणिक संकुलात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चाकण ब्लड बँकच्या सहकार्याने शिबिरात 69 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर 150 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली.
यावेळी रक्तदात्यास जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने सहा लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच देण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटक श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव वैभव तांबे यांनी रक्तदान करण्यामागची भूमिका व महत्व अधोरेखित करीत रक्तदान हे सर्व दानापेक्षा सर्वश्रेष्ठदान असल्याचे प्रतिपादन करून उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रक्तदान करण्याचे आवाहन करून शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी रक्तदानाच्या आवश्यकतेबाबत विवेचन करून रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राहुल कोल्हे, अमित झोडगे, प्राचार्य डॉ. प्रमोद इंगळे, डॉ.प्रवीण भोई, डॉ. शांतीसागर भुजबळ, विजय केवडकर, यशवंत कांबळे, किशोर खरोसे, ऋतिक म्हेत्रे, अजय रोडगे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे, खजिनदार मयूर ढमाले यांचे मार्गदर्शन लाभले.
सूत्रसंचालन प्रा. संजीव कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. कैलास अस्तरकर यांनी मानले. प्रा. दीपाली ताम्हाणे, प्रा. शाहूराज येवते, कार्यालयीन अधीक्षक प्रवीण भावे, तसेच सर्व विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती, अशी माहिती प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी दिली.