अँग्लो-इजिप्शीयनांची तडजोड उभय पक्षांना मसुदा मान्य
कैरो, ता. 30 : सप्टेंबर महिना संपण्यापूर्वीच सुवेझ कालव्यांतून ब्रिटीश सैन्य काढून घेण्याबाबत अँग्लो-इजिप्शीयन वाटाघाटी सुफलीत होतील, असें इजिप्शीयन लष्करी गोटांतून विश्वसनीयरीत्या कळतें.
सध्या चाललेल्या अँग्लो-इजिप्शीयन वाटाघाटी पूर्ण झालेल्या असून उभय पक्षांनीं तडजोडीचा एक मसुदा मान्य केला आहें.
सुवेझ कालवा भागातील ब्रिटीश सैन्याचे सेनापति जनरल सर ब्रियॉन रॉबर्टसन हे तो मसुदा घेऊन ता. 5 रोजीं लडंनला जाणार आहें व त्यावर ब्रिटीश सरकारचें शिक्कामोर्तब घेऊन 15 सप्टेंबरच्या सुमारास परत येणार आहेंत. अँग्लो-इजिप्शीयन वादांतील सारे मतभेद मिटले असून उभयपक्षांना सन्मान्य अशी तडजोड झाली आहें.
युद्धकाळांत पाश्चिमात्य राष्ट्रांच्या सैन्यानें सुवेझ कालवा भागांत राहावें; पण युद्धाचे भय असलेल्या काळात पाश्चिमात्य राष्ट्राचें सैन्य ठेवण्याची जरूर नाहीं, असें दोन्ही पक्षांनी ठरविलें आहे.
भारत विरोधी भूमिका घेऊन अमेरिकेचा अनुनय करणाऱ्या पाकिस्तान सरकारला “घरचा आहेर’
लाहोर, ता. 30 : कोरिया राजकीय परिषदेंत भारताच्या भागीदारीस विरोध करून अमेरिकेचा अनुनय करणाऱ्या पाक सरकारवर येथील वजनदार समजल्या जाणाऱ्या “पाकिस्तान टाइम्स’ पत्रानें एक अग्रलेख लिहून खरमरीत टीका केली. या अग्रलेखाचा मथळा “थॅंक्यू अमेरिका’ असा आहें.
राजकीय दिवाळखोरी…
सदर पत्र म्हणते- पाक प्रतिनिधीचें मतदान म्हणजें राजकीय दिवाळखोरी आहें. अमेरिकन गहू कराचीत येताच कराची गोदी जवळ शेकडो उंटांच्या पाठीवर “थॅक्यू अमेरिका’ असें फलक लावून कृतज्ञता प्रदर्शन केली. अमेरिकेत कुजून चाललेल्या गव्हाच्या या देणगीबद्दल कृतज्ञतेचे जें उत्साहि प्रदर्शन करण्यात आलें त्याचाच या मतदानांशी संबंध जोडला जाईल. कोरिया राजकीय परिषदेंत भारताची भागीदारी अत्यंत जरूरीची असताना; अरब-आशियाई गटाच्या बाहेर पडून पाकिस्तानने विरोध करावा हे दुदैवी आहे.