61 वर्षांपूर्वी प्रभात : डांगी मुलांचे निर्भय निदर्शन

मराठीत शिक्षण मिळावे म्हणून कलेक्‍टरकडे मागणी

अहवा, ता. 6 – ता. 2 रोजी सायंकाळी येथे सुमारे 60 ते 70 लहान मुलांनी उत्स्फूर्त अशी मिरवणूक काढून “डांगची भाषा मराठी’, “डांग गुजरातला जोडू नका’ अशा घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेला. तेथे गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्या मुलांनी आमची भाषा मराठी आहे म्हणून आमचे शिक्षण मराठीत झाले पाहिजे असे सांगितले. त्यानंतर सर्व मुले शिस्तीत पोलिसांच्या कड्याजवळ जाऊन थांबली व तेथेच त्यांनी जाहीर सभा घेतली. मुलांच्या या धीटपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जुनागड भारतात सामील झाले हा जनतेचा विजय

जुनागड – कॉंग्रेसचे अध्यक्ष संजीव रेड्डी यांनी मंगरोल येथे भाषण करून असे सांगितले की जुनागड संस्थान भारतात सामील झाले हा जुनागडच्या प्रजेच्या इच्छेचा विजय आहे. संस्थानच्या नवाबाच्या इच्छेवर प्रजेने मात केली आहे.

पुण्यातील हिवतापाच्या रोगास आळा कसा बसला?

“जागतिक आरोग्य दिन’ आज ता. 7 एप्रिल रोजी सर्व जगभर साजरा करण्यात येत आहे. पुण्यातही आज हा दिन पुणे कॉर्पोरेशनतर्फे साजरा होत आहे. चालू साली “मलेरिया निर्मूलन’ हे या दिवसाचे घोषवाक्‍य असून त्यादृष्टीने पुण्यातील नागरिकांना या दिवसाचे महत्त्व पटवून देणे व त्यांचेकडून जास्तीत जास्त सहकार्य मिळविणे याबाबत प्रयत्न करण्यात येत आहेत. हिवतापाचे साथीस आळा घालण्याचे दृष्टीने मुंबई सरकारने सन 1944 पासून सुरुवात केली.

त्यावेळी पुणे शहरात फार मोठ्या प्रमाणात हिवतापाचे रोगी आढळून येत असत. विशेषतः नदीकिनार व कॅनॉलजवळच्या वस्त्यांतून हिवतापाचा पादुर्भाव जास्त प्रमाणात होता. सन 1948-49 पासून पुण्यात नदीकिनार व इतर पाणथळ जागी होणाऱ्या डासोत्पत्तीस आळा घालण्याकरीता एक योजना सरकारकडून हाती घेण्यात आली. डी.डी.टी. सिंचनाचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे शहरातील हिवतापाचे रोगास थोडाफार आळा बसला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.