व्यक्‍तिविशेष : कविवर्य राजा बढे

शर्मिला जगताप

लेखक, संपादक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, चित्रपट अभिनेते, निर्माते, गायक, कवी आणि गीतकार असे बहुआयामी व्यक्‍तिमत्त्व असलेले आणि “गर्जा महाराष्ट्र माझा’ हे स्फूर्तिगीत रचणारे राजा बढे यांचे आज पुण्यस्मरण.

1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली, यानिमित्त बढे यांनी रचलेल्या “गर्जा महाराष्ट्र माझा’ या भूप रागातील स्फूर्तिगीताला श्रीनिवास खळे यांनी संगीत दिले आणि शाहीर साबळे यांनी बुलंद आवाजात गायले. या गीताची आजही मराठी मनाला भुरळ पडते. महाराष्ट्रात कथाकथनाच्या कार्यक्रमाची सुरुवात राजा बढे यांनी केली.

त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1912 रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव राजा नीळकंठ बढे. त्यांचे प्राथमिक शिक्षण छिंदवाडा व माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक हायस्कूलमध्ये झाले. आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी भावंडांचे पालनपोषण केले. मॅट्रिकनंतर नोकरी पत्करली त्यामुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. भावंडांचे पालनपोषण नीट व्हावे म्हणून त्यांनी लग्न केले नाही. 

त्यांनी मराठीतील नावाजलेल्या विविध वृत्तपत्रांमध्ये विविध ठिकाणी नोकरी केली. नियतकालिके व साप्ताहिकांमध्येही लेखन केले. “कोंडिबा’ या टोपणनावाने त्यांनी राजकीय वात्रटीका लिहिल्या. राजा बढे यांचा संस्कृत काव्य आणि उर्दू शायरीचा चांगला अभ्यास होता. गीत, गझलबरोबरच “चारोळी’मध्येही त्यांनी रचना केल्या. त्यांनी वर्ष 1940च्या सुमारास “सिरको फिल्म्स’च्या माध्यमातून चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. दोन वर्षे तेथे त्यांनी काम केले.

वर्ष 1942 मध्ये ते “प्रकाश स्टुडिओ’त रूजू झाले. त्यांनी “रामराज्य’ चित्रपटाची गाणी लिहिली. महेश कौल यांच्यासोबत “अंगुरी’ चित्रपटात काम केले. “धाडिले राम तिने का वनी’ या नाटकासाठी त्यांनी अभिरामा सुखधामा हे भैरवी रागातील नाट्यगीत लिहिले व पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी ते गायले. आपल्या बंधूंच्या साहाय्याने “स्वानंद चित्र’ ही चित्रपट संस्था स्थापली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “रायगडचा राजबंदी’ हा चित्रपट काढला. याच चित्रपटासाठी त्यांनी रचलेले “उधं गं अंबे उधं’ हे लोकगीत शाहीर पिलाजीराव सरनाईक यांनी गायले. आकाशवाणीवर “निर्माता’ म्हणून 1956 ते 1962 या कालखंडात त्यांनी काम केले. नोकरी सोडल्यावरही त्यांनी आकाशवाणीला छोटे छोटे माहितीपट करून दिले. त्यांनी शिवाजी महाराजांवर एक चित्रपट निर्माण केला. 

त्यांनी रचलेली “कळीदार कस्तुरी पान’ ही लावणी श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केली व सुलोचना चव्हाण यांनी गायली. त्यांच्या कवितांवर स्वा. सावरकरांचा प्रभाव दिसतो. “क्रांतिमाला’ या संग्रहात देशभक्‍तिपर 21 कविता आहेत. त्यांच्या साहित्य संपदेमध्ये 18 काव्यसंग्रह, 4 नाटके, 9 संगीतिका, 5 एकांकिका, 1 कादंबरी यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा प्राचीन राजा हाल सातवाहन ह्याच्या काव्यांचे संकलन असलेल्या “गाथा सप्तशती’चा मराठी अनुवाद त्यांनी केला.

मुंबईतील “कवी राजा बढे चौक’ त्यांच्या नावावर आहे. नागपूरच्या महाल पेठेतील सी. पी. ऍन्ड बेरार महाविद्यालयासमोरील चौकासही राजा बढे यांचे नाव दिले आहे. त्यांचे 7 एप्रिल 1977 रोजी निधन झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.