पुणे – प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या रिक्षा चालकास दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. रेखाचित्र आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्याचा माग काढण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी अधिक तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. त्यानुसार विशेष न्यायाधीश एस.पी.पोंक्षे यांनी त्याला सात दिवस पोलीस कोठडी सुनावली.
अरविंद वामन घोलप (60, रा. पर्वती) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत 14 वर्षीय मुलीने तक्रार दिली होती. पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी टीम तयार करुन आरोपीचा शोध सुरू केला. यादरम्यान, पोलिसांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये रिक्षाचे अंधुक चित्रण आणि वाहनाचा नंबर मिळाला. प्रा. डॉ. गिरीश चरवड यांनी आरोपीचे रेखाचित्र तयार केले. दरम्यान रेखाचित्राप्रमाणे साम्य असणारा रिक्षाचालक पर्वती टेकडीजवळ असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार सापळा रचून अरविंद घोलप यास जेरबंद करण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, हवालदार कुंदन शिंदे, राजू जाधव, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे, शिवाजी क्षीरसागर, शरद राऊत, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, प्रमोद भोसले, विष्णू सुतार, पुरुषोत्तम गुन्ला व राहुल ओलेकर यांच्या पथकाने केली.
प्रा. डॉ. गिरीश चरवड यांच्याकडून आरोपीचे रेखाचित्र काढून घेतले. यावरुन आरोपीस दत्तवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुन्हा केल्यानंतर आरोपीला तक्रार दाखल झाल्याची माहिती नव्हती. यामुळे तो नेहमीप्रमाणे रिक्षातून प्रवासी वाहतूक करत होता.
– कृष्णा इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक