भीमा कोरेगाव प्रकरण : पुढील सुनावणी शनिवारी
पुणे – एल्गार परिषद आणि भीमा कोरेगावप्रकरणी अटक असलेल्या 6 संशयितांचा जामीन अर्ज बुधवारी विशेष न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.
सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, महेश राऊत, शोमा सेन, रोना विल्सन आणि वरवरा राव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. यावेळी न्यायालयाने “सर्व संशयितांना हे बंदी असलेल्या (माओवादी) संघटनेशी संबंधित आहे. सर्वजण बंदी असलेल्या संघटनेचे सक्रिय सदस्य असून संघटनेचे ध्येयधोरण पूर्ण करण्यासाठी काम करतात,’ असे सांगून हे लोकशाहीसाठी धोक्याचे असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने यावेळी काढला. रोना विल्सन यांच्याकडे मिळालेल्या कागदपत्रात शस्त्र खरेदीचा उल्लेख मिळाला आहे. आत्मसर्पण केलेल्या पहाडसिंग या नक्षलवाद्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात अटक करण्यात आलेल्यांचा कामाबाबातची माहिती सांगितली आहे.
सुरेंद्र गडलिंग यांनी प्रकाश यांना पत्र लिहले असून, त्यात “ज्या ठिकाणी पोलिसांची संख्या कमी आहे. अशा ठिकाणी हल्ला करावी,’ असे नमूद केले आहे. तसेच गडलिंग यांची यांची इतकीच मर्यादित भूमिका नसून ते माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत. वरवरा रावकडे सापडलेल्या कागदपत्रांत माओवाद्यांच्या राजकीय आणि ध्येयधोरणांबाबत भाष्य सापडले आहेत. तसेच त्यांच्या पेन ड्राइव्हमध्ये शहरी भागातील नक्षलवादाचे काम आदी कागदपत्रे सापडले आहे. ही सर्व कागदपत्रे, पत्रांचा विचार करून जामीन अर्ज फेटाळल्याचे निर्णयात नमूद केले आहे. पुढील सुनावणी दि.9 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
संशयित एकमेकांसोबत होते संपर्कात
सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी बाजू मांडली. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताना “सर्व संशयित एकमेकांसोबत फोनवर संपर्कात होते, महेश राऊत यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पत्रात कोरेगाव भीमा येथील दंगलीबाबत उल्लेख सापडला आहे,’ असे म्हटले.