कानपूर – तबलिगी जमातच्या सदस्यांनी कानपूरमधील ज्या सहा ठिकाणी भेट दिली होती, ती ठिकाणे “रेड झोन’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या तबलिगी सदस्यांमध्ये दोन विदेशी नागरिकांचा समावेश होता. या सर्वांनी दिल्लीतील धार्मिक समारंभामध्ये भाग घेतला होता आणि त्यांची करोनासाठी केलेली टेस्ट “पॉझिटिव्ह’ आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चमनगंजमधील हलीम प्राथमिक मशिद, कर्नलगंजमधील हुमायूं मशिद, बाबूपुरवा येथील सुफा मशिद, सजेती येथील नौपास्ता आणि घाटमपूर येथील बडी मशिद या ठिकाणी तबलिगी जमातच्या सदस्यांनी भेट दिली होती. भेट देणाऱ्यांमध्ये करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह असलेल्या सहा जणांचाही समावेश होता. ही ठिकाणे “रेड झोन’ म्हणून घोषित केली गेली आहेत, असे जिल्हा दंडाधिकारी ब्रह्मदेव राम तिवारी यांनी सांगितले.
ही “रेड झोन’ एक किलोमीटरच्या परिघाची असून या परिसरात जेथे तबलिगी सदस्य गेले होते, तेथील निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन दरम्यान लोकांच्या हालचाली आणि बेकायदेशीरपणे एकत्र येण्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी ‘रेड झोन’ भागात ड्रोन तैनात केली आहेत.