जामखेडला अजूनही 59 टॅंकरद्वारे पाणी

जामखेड -पावसाळा सुरू होऊन प्रत्यक्षात वीस दिवसांचा कालावधी उलटला असला तरी जामखेड तालुक्‍यातील पाणी टंचाईची धग कायम असल्याने नागरिकांना भर पावसाळ्यातही पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे. सध्या तालुक्‍यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने 59 टॅंकरने 52 गावे 86 वाड्यावस्त्यांना 127 खेपांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

विकतच्या पाण्यामुळे हॉटेल व्यवसाय तोट्यात
सध्या तालुक्‍यात विकतचे पाणी देखील वेळेवर मिळत नसल्याने पाणी मिळविण्यासाठी एक प्रकारची स्पर्धा करावी लागत आहे. पाणीटंचाईची झळ हॉटेल्स व्यावसायिकांना देखील बसली आहे. विकतचे पाणी घेऊन आपला व्यवसाय चालवावा लागत आहे. एकीकडे दुष्काळात धंद्यात मंदी आली आहे तर दुसरीकडे विकतचे पाणी घ्यावे लागते, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सद्यस्थितीत अनेक गावात टॅंकर भरण्यासाठी देखील पाणी मिळत नसल्याने टॅंकर चालकांनाही पाण्याच्या शोधात फिरावे लागत आहे. काही ग्रामस्थ विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवत आहेत. आणखी काही दिवस पाऊस लांबला तर पाण्याच्या शोधार्थ अनेक गावच्या ग्रामस्थांना गाव सोडण्याची वेळ निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्‍यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून कमी पर्जन्यमान होत असल्यामुळे जमिनीच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे.

यंदा देखील तीच परिस्थिती कायम असल्याने तालुक्‍यातील तलावात अपेक्षित जलसाठा न झाल्याने डिसेंबर महिन्यातच तळ गाठला होता. त्यामुळे तालुक्‍यात डिसेंबरपासुनच भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले आहे. हवामान खात्याने पाऊस लांबणार असल्याचे भाकीत दिले आहे. त्यामुळे पावसाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सध्या तरी तालुक्‍यात 59 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पाणी भरण्यासाठी तालुक्‍यातील मोहरी तलावातून टॅंकर भरत आहे. अनेक गावात एक हजार लिटर पाण्यासाठी 500 रुपये मोजावे लागत आहे. तर वीस लिटरचा जार तीस रुपयास मिळत आहे. ऐन दुष्काळात सामान्यांना पाण्यावर खर्च करावा लागत आहे. पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाची मोठी दमछाक होत आहे. आणखी काही दिवस पाऊस लांबला तर पाणी टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाची मोठी ताराबंळ उडणार आहे. दरम्यान, दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.