डेन्वर (अमेरिका) – अमेरिकेत एका बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात 4 जण ठार झाले, तर एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. हल्लेखोराला प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नांत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा हल्लेखोरही ठार झाला आहे, असे लेकवुड पोलिसांनी सांगितले.
डेन्वर शहराच्या मध्यभागात संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. या ठिकाणी हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात दोन महिला ठार झाल्या आणि एक जण जखमी झाला. त्यानंतर थोड्याच वेळात थोडे अंतर दूरवर आणखीन एका माणसाला गोळ्या घालून मारण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोराच्या दिशेने गोळीबार केला. हल्लेखोराने देखील पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला आणि तो जवळच्या लेकवुड शहरात पळून गेला, असे डेन्वर पोलीस प्रमुख पॉल पाझन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संध्याकाळी 6 वाजता बाजारात गोळीबार झाल्याचे लेकवुड पोलिसांना समजले. त्या हल्लेखोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्लेखोराने पुन्हा गोळीबार केला. यावेळी चकमकीदरम्यान आणखीन एक जण ठार झाला. त्यानंतर या हल्लेखोराचाही मृतदेह सापडला. या हल्लेखोराची ओळख पटू शकलेली नाही.