काठमांडू – मानवाचा सर्वात प्रामाणिक आणि सर्वोत्तम मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्वानांना नेपाळमध्ये विशेष महत्त्व आहे. या श्वानांच्या पूजेसाठी नेपाळमध्ये पाच दिवसांचा विशेष महोत्सव सुरू झाला आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण नेपाळमधील श्वानप्रेमी नागरिकांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे आणि आपल्या लाडक्या कुत्र्याची विधिवत पूजा देखील केली जाते आहे.
“कुकूर तिहार’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवात कुत्र्यांची पूजा करण्याबरोबर कुत्र्यांचा सन्मान करण्याचीही परंपरा आहे. या महोत्सवात कुत्र्यांना सजवले जाते. हार घातले जातात. त्यांच्या कपाळावर गंधाचा टिळा लावला जातो आणि त्यांना भरपूर खायलाही घातले जाते. संपूर्ण नेपाळमध्ये हा “कुकूर तिहार’ महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. लहान मुलांसाठी हा महोत्सव म्हणजे आपल्या लाडक्या डॉगीचे लाड करण्याची संधीच असते. या दिवशी मुले आपल्या कुत्र्यांना दूध, अंडी यासारखे पदार्थ खायला घालण्यासाठी अगदी तयार असतात.
या वर्षी “कुकूर तिहार’ महोत्सव 24 ऑक्टोबरला म्हणजेच कालच सुरू झाला. नेहमीप्रमाणे लोकांनी अगदी उत्साहाने या महोत्सवाचा आनंद लुटला. “कुकूर तिहार’ महोत्सवाला एक धार्मिक एक अर्थ आहे. हिंदूंच्या मान्यतेमुसार श्वानांना यमराजाचे दूत समजले जाते. त्यामुळे यमराजाला खूष करण्यासाठी यमराजाच्या दूताची म्हणजे कुत्र्यांची पूजा केली जाते.
“कुकूर तिहार’ महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भटक्या कुत्रचीही पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये कुत्र्यांना कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणे स्थान असते. त्यांचे कुटुंबीयांशी असलेले नाते शब्दांत वर्णन करता येऊ शकणार नाही. “कुकूर तिहार’ महोत्सव त्याचेच प्रत्यंतर देतो.