नवी दिल्ली: एअर इंडियाचे 5 वैमानिक आणि दोघा कर्मचाऱ्यांना करोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कालच एअर इंडियाच्या तब्बल 77 वैमानिकांची करोनाची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये या 5 वैमानिकांना लागण झाल्याचे उघड झाले. बाधा झालेल्या कोणत्याही वैमानिकामध्ये करोनाची लक्षणे दिसत नसून त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात आली आहे. बाधा झालेले सर्वजण मुंबईतील रहिवासी असून हे सर्व वैमानिक एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर्स विमानाचे वैमानिक आहेत. या सर्वांनी सर्वात शेवटी 20 एप्रिलला विमान उडवले होते.
सध्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये विदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची मोहिम सुरू आहे. त्या मोहिमेंतर्गत इराण आणि इटलीत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याच्या कामगिरीवर एअर इंडियाची ही विमानसेवा सुरू आहे. आखाती देशांमधील काही देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याचे काम या वैमानिकांवर सोपवण्यात आले आहे.
7 मे पासून सुरू झालेल्या या मोहिमेत एअर इंडियाच्या 64 विमानांद्वारे विदेशातील 15 हजार भारतीयांना पहिल्या आठवड्यात मायदेशी आणले जात आहे. एकूण 1 लाख 90 हजार भारतीयांनी भारतात परत येण्यासाठी नोंदणी केली आहे.