48 वर्षांपूर्वी प्रभात | ता. 9, माहे जुलै, सन 1973

हृदयातील द्विदल झडप नवी बसवण्याची अपूर्व शस्त्रक्रिया
पुणे, ता. 8 – हृदयातील द्विदल झडप (मायट्रल व्हॉल्व्ह) काढून त्याजागी दुसरी मानवी झडप बसवण्याच्या दोन शस्त्रक्रिया नुकत्याच येथील ससून रुग्णालयात करण्यात आल्या व त्या यशस्वी झाल्या. भारतात अशा प्रकारची शस्त्रक्रिया यापूर्वी झालेली नव्हती. डॉ. अशोक कानेटकर यांनी 20 डॉक्‍टरांच्या सहकार्याने या शस्त्रक्रिया केल्या.

कोणते बरोबर? बेंगॉली की बंगाली?
चंदीगढ – बांगला नागरिकाला “बेंगॉली’ म्हणावे की, “बंगाली’ म्हणावे असा प्रश्‍न विचारताच सरदार स्वर्णसिंग म्हणाले, याबाबत परंपरा काहीही असो “बंगाली’ हा अधिक बरोबर आहे. त्याचे इंग्रजी स्पेलिंगही तसेच करावे. बांगलादेश सरकारनेही दोन्ही उच्चारांना मान्यता दिली आहे.

खेडी व शहरे दोन्हीचा विकास होणे जरूर
मुंबई – “शहरांचा व खेड्यांचा, दोन्हींचा विकास होणे जरूर आहे. यापैकी कशालाच दुय्यम स्थान देऊन चालणार नाही. शहरांचा विकास झाला तरच खेड्यांचे प्रश्‍न सुटतील व खेड्यांचा विकास झाला तरच शहरांचे प्रश्‍न सुटतील’, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सांगितले. औरंगाबाद शहराच्या विकासाची योजना “सिडको’तर्फे इंदिराजींना सादर केली.

अपोलो-सोयुझ संयुक्‍त अंतराळ प्रवास!
मॉस्को – अंतराळ प्रवास अमेरिका व रशिया यांनी संयुक्‍तपणे करावा व त्यासाठी जी तयारी करायची ती करण्यासाठी रशियन अंतराळ खात्याचे अधिकारी वॉशिंग्टनला रवाना झाले आहेत. त्यांचे बरोबर 10 रशियन अंतराळवीरही आहेत. 1975 साली अपोलो-सोयुझ यांचा संयुक्‍त अंतराळ प्रवास योजण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.