सरकार गव्हाचा वापर पुन्हा ताब्यात घेणार?
नवी दिल्ली, दि. 11 – रब्बी हंगामात गव्हाच्या खरेदीची किंमत किती ठेवावी त्यावर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पुढील आठवड्यात भरेल. अंदाज असा आहे की, सध्याची 105 रुपये क्विंटल ही किंमत वाढवून देण्यात येणार आहे. सरकारचा हेतू असा आहे की, गव्हाचा घाऊक व्यापार ताब्यात घ्यावा. परंतु 73-74 सालच्या चुका न करता नव्या धर्तीवर व्यापार ताब्यात घेण्यात येईल. गव्हाचा घाऊक व्यापार ताब्यात घेण्यास सध्या अनुकूल परिस्थिती आहे. कारण रब्बी हंगामाचे पीक खूप येणार आहे.
दिग्बोई रिफायनरीच्या राष्ट्रीयीकरणाची मागणी
नवी दिल्ली – “ऑइल इंडिया लिमिटेड’चे व दिग्बोई (आसाम) येथील तेल शुद्धीकरण केंद्राचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे अशी मागणी आसाममधील 17 खासदारांना केली आहे. सध्याचा तेलाचा पेच प्रसंग लक्षात घेता हे राष्ट्रीयीकरण आवश्यक आहे.
अमेरिकेवर कर्जाचा डोंगर!
वॉशिंग्टन – अमेरिकेवर कर्जाचा प्रचंड डोंगर आहे! अमेरिकन अर्थव्यवस्था कर्जावर इतकी अवलंबून आहे की, त्याशिवाय ती गडगडेलच! गेल्या वर्षी अमेरिकेवर एकूण 2700 अब्ज डॉलर्सचे कर्ज होते. अमेरिकन कोषागाराचे चिटणीस विल्यम सायमन यांनी म्हटले आहे की, देशाला भविष्यकाळातील गरजांसाठी पैसा उपलब्ध असावा, यासाठी सरकारने खर्चाऐवजी बचतीवर भर देणे जरूर आहे!
कंबोडियात अध्यक्ष हटाव मोहीम
नॉमपेन्ह – कंबोडियन अध्यक्ष लॉन नॉल हटाव मोहिमेचा भाग म्हणून कंबोडिया सरकारने वरिष्ठ लष्करी व नागरी अधिकाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यास सुरुवात केली आहे.
“कोरा कागज’ चित्रपटास पारितोषिक
नवी दिल्ली – 1974चे शमा सुषमा चित्रपट पारितोषिक “कोरा कागज’ या चित्रपटास देण्यात आले आहे. जया भादुरी ही उत्तम नटी तर दिलीपकुमार यास उत्तम नट ठरविण्यात आले.