पुणे – केंद्र सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्यामार्फत अजिंठा लेणीतील सुप्रसिद्ध चित्रांतील मूळरंग तपासण्याचे कार्य सुविख्यात असे तीन चित्रकारीतील तज्ज्ञ करत आहेत. लेणी क्र. 1-2-16 व 17 येथील ही जगप्रसिद्ध चित्रे सध्या कॅनव्हासच्या कागदावर उतरविली जात असून 20 टक्के काम पुरे झाले आहे.
याबाबत युनेस्कोची मदत घेतली असून स्मिथोसोनीयन इन्स्टिट्यूट ऑफ अर्कालॉजी व प्रा. लरिन्स मिनेव्हस्की यांनी त्यासाठी लेण्यास भेट दिली व चाललेल्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. कन्झर्व्हेशन ऑफ अर्कालॉजी विभागाचं प्रमुख आर. सेनगुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एन. बावखंडी, चंद्रशेखर व बी. एन. रामचंद्रप्पा हे चित्रतज्ज्ञ या चित्रांचे पुरर्चित्रण करत आहेत. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सूचनेनुसार या चित्रांचा व त्यातील रंगांचा अभ्यास होत आहे.
हस्तीदंती मानवी सांगाडा
विशाखापट्टणम – हस्तीदंताचा मानवी सांगाडा आता येथील कुटुंबनियोजन प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. मागे तंजावरच्या राजाला शरीरशास्त्र शिकण्याची इच्छा झाली तेव्हा त्याने एका फ्रेंच शरीरशास्त्रज्ञाला बोलावून घेतले. पुढे राजवाड्यात मानवी हाडांचा सांगाडा आणणे आक्षेपार्ह ठरल्यामुळे त्या राजाने हस्तीदंती व चंदनी सांगाडे तयार करून घेतले. पुढे त्या राजाच्या वंशजांनी हस्तीदंती सांगाडा विकून टाकला. तो सांगाडा येथील वैद्यकीय संस्थेत सापडला. ही कथा 1085 सालातील आहे.
आता विटी-दांडू
लखनौ – विटी-दांडू या खेळाकरिता नव्याने भारतीय पातळीवर एक संघटना स्थापन झाली असून ह्या खेळाला नियमबद्ध करण्याकरिता येथे 20 एप्रिलला एक परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. यूपी ऑलिम्पिक असोसिएशनचे चिटणीस ए. सी. चटर्जी हे परिषदेच्या अध्यक्षपदी असतील.