काठमांडू – जगाच्या इतिहासात प्रथमच स्त्रियांनी हिमालयातील अत्युच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले. जपानच्या 35 वर्षांच्या जेको माबेंई या बाईने दुपारी साडेबारा वाजता एव्हरेस्ट जिंकला. ही बाई गृहिणी असून तिला 3 वर्षांची मुलगी आहे.
पुरुषांबरोबरीने स्त्रीला स्थान
वाई – प्राचीन भारतात स्त्रीप्रधान समाज व्यवस्था होती. पुढे मातृप्रधान संस्कृती व पितृप्रधान संस्कृती यांचा संगम झाला. मध्ययुगात स्त्री परावलंबी झाली आणि असा बदल होत आजची असंस्कृत कुटुंबसंस्था झाली. स्त्री ही कुटुंबसंस्थेतील शक्ती आहे. म्हणून तिला बरोबरीचे स्थान मिळाले पाहिजे, असे मत लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मांडले.
हसतमुख राहणं हे सौंदर्याचे मोठं लक्षण
कोल्हापूर – प्रत्येक माणूस जन्मजात नट असतो, पण त्या उपजत गुणाला झिलई देणं त्याला जमत नाही. नाट्य हे जीवनाचं अंग आहे. महाराष्ट्रात नाट्य फुलत गेलं ते लोकमान्यांच्या कालखंडापासून “कीचकवध’ हे नाटक लिहून काकासाहेब खाडिलकर यांनी नाटकाचे सामर्थ्य काय असते याची जितीजागृती जाणीव परकीयांना करून दिली, असे ओजस्वी उद्गार सुलोचना लिमये यांनी काढले.
उत्तम नटाची लक्षणे, अभिनय म्हणजे काय, याचे त्यांनी साभिनय विवेचन केले. त्या म्हणाल्या, हसतमुख राहणं हे सौंदर्याचं सर्वात मोठं लक्षण आहे. आज माणसावर हरतऱ्हेचे ताण पडले आहेत ते दूर व्हायला हास्य हेच एक प्रभावी औषध आहे.