इंग्रजी भाषेत आपले तरुण कमी पडतात
पुणे, दि. 1 – इंग्रजी भाषेशी आपला संबंध 150 वर्षे आलेला आहे. ही भाषा समृद्ध आहे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविणे जरूर आहे पण आपले तरुण त्यामध्ये कमी पडतात. तेव्हा तिचा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. भाषेवर प्रेम केल्याशिवाय भाषा येत नसते. त्यामुळे इंग्रजीवर प्रेम केल्यास ही भाषा अवगत होईल. चीनमध्ये, जपानमध्ये इंग्रजी भाषेतून शिकविले जाते, असे उद्गार ऍडमिरल एम. पी. औटी यांनी राष्ट्रीय प्रबोधिनी येथे काढले.
दर सिगारेटमुळे इतके आयुष्य होते कमी
लंडन – सिगारेट ओढणाऱ्या माणसाचे आयुष्य त्याने ओढलेल्या प्रत्येक सिगारेट मागे साडेपाच मिनिटे याप्रमाणे कमी कमी होत असते, असे येथील “रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स’ने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. तथापि, जर धूम्रपान करणे अजिबात सोडून दिले, तर अशा व्यक्तीचा लवकर मरण्याचा धोका 10 ते 12 वर्षांत नाहिसा होतो, असेही हा अहवाल तयार करणाऱ्या अभ्यासकांचे मत आहे.