व्हिएतनाम प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश
संयुक्त राष्ट्रसंघ, दि. 21 – तीस वर्षांच्या लढ्यानंतर स्वातंत्र्य मिळविलेल्या व्हिएतनाम समाजवादी प्रजासत्ताकास काल संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व देण्यात आले.
आमसभेच्या 32व्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. व्हिएतनाम हे राष्ट्रसंघाचे 149वे सदस्य राष्ट्र आहे. जिबौती या आफ्रिकेतील राष्ट्रालाही (पूर्वीच्या फ्रेंच वसाहतीला) सदस्यत्व देण्याचा निर्णय आमसभेने घेतला. व्हिएतनामला सदस्यत्व द्यावे, असे सुचविणाऱ्या सुमारे 100 देशांत भारत हा एक प्रमुख देश होता.
कापडाच्या प्रत्येक मीटरवर किमतीचे शिक्के
मुंबई – केंद्र सरकारने आज घेतलेल्या एका निर्णयामुळे कापड गिरण्यांना अनियंत्रित कापडाच्या प्रत्येक मीटरवर फॅक्टरीबाहेरील किंमत व अबकारी कर याची रक्कम छापावी लागणार आहे. तसेच तागावरही ही किंमत छापावी लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करण्यात येईल, असे येथील टेक्स्टाइल्स कमिशनर कचेरीतून सांगण्यात आले.
जे कापड ताग्यात बांधलेले असेल तथापि, ते बाहेर पडले नसेल तर तागे उघडून त्यावर किमतीचे शिक्के मारावे लागणार आहेत.