तेल निर्यातदार देशांचे दराविषयी एकमत नाही
कॅराकस, दि. 16 – तेल निर्यातदार देशांच्या संघटनेतील 13 देशांचे, तेलदर समान ठेवण्याबाबत अजून एकमत झालेले नाही, असे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष कार्लोस अँड्रेस पेरेझ यांनी सांगितले. व्हेनेझुएला हा तेल निर्यातीच्या बाबतीत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्याने अजून या दराबाबत “थंड, सावध व ठाम’ धोरण ठेवले आहे, असे पेरेझ म्हणाले.
तेलदराच्या बाबतीत निर्यातदार देशांत नजिकच्या भविष्यकाळात एकमत होईल; परंतु ते काय असेल ते मात्र मी सांगू शकणार नाही, असे पेरेझ म्हणाले. तथापि, नवीन तेलदर यंत्रणा तिसऱ्या जगातील (तटस्थ) राष्ट्रांच्या हिताचीच असेल, यावर कार्लोस पेरेझ यांनी भर दिला आहे.
यंत्रचलित सायकल रिक्षांना वाहन कायद्यातून वगळले
मुंबई – माणसाकडून ओढल्या जाणाऱ्या परंतु 35 सीसी पर्यंत शक्तीचे यंत्र बसवून यंत्रचलित (मोटाराइज्ड) सायकल रिक्षांना व त्या चालविणाऱ्यांना 1939 च्या मोटारवाहन अधिनियमाच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. मात्र या रिक्षांच्या सध्याचाच आकार, रचना व गती आदींमध्ये कुठलाही फरक नसावा.
भोळे आयोगाचा अहवाल सादर
पुणे – महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या वाढत्या महागाई संदर्भात नेमण्यात आलेल्या भोळे कमिशनचा अहवाल कमिशनचे अध्यक्ष आर. एस. भोळे यांनी सादर केला. या आयोगानुसार विविध वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांना रुपये 14 ते 52 पर्यंत महागाई भत्त्यात वाढ मिळणार आहे.