Asian Taekwondo championship 2024 : हनोई येथे झालेल्या आशियाई तायंक्वादो अजिंक्यपद स्पर्धेत रूपा बायोर आणि रुदाली बरुआ यांनी कांस्यपदकाची कमाई केली आहे. या पदकामुळे आत्मविश्वास उंचावला. स्वप्नपूर्ती झाली, अशी प्रतिक्रिया रूपा बायोरने दिली आहे. रूपा बायोरने पुमसे गटातील वैयक्तिक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली आहे, तर क्योरूगी प्रकारात रुदाली बरुआ हिने कांस्यपदक पटकावले आहे. या यशाबद्दल खेळाडूंचे कौतुक होत आहे.
अरुणाचल प्रदेश येथील रूपा या युवा खेळाडूने पुमसे या सर्वांत आव्हानात्मक गटात भारताला कांस्यपदक मिळवून दिले. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही चमक दाखवण्याची रूपा हिच्याकडे क्षमता होती. जर भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या सहकार्याने प्रवेशिका मिळाली असती, तर आशियाई क्रीडा स्पर्धेत देखील भारताला ऐतिहासिक पदक नोंदविता आले असते. आशियाई स्पर्धेतील सांघिक विभागातही भारतीय खेळाडूंनी रुपेरी यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये भारताला दहा वर्षांनी पहिल्यांदाच पदकांची कमाई झाली आहे.
World Para Athletics Championships 2024 : सचिन खिलारेचे सर्वोत्तम कामगिरीसह सुवर्णयश….
कांस्यपदक विजेत्या रुपा बायोरच्या कामगिरीला उजाळा देत सीता, हर्षा सिंघा, उषा धामणस्कर यांनी सांघिक विभागात भारतीय संघासाठी पदकांचे दुहेरी यश संपादन केले. या तीनही नैपुण्यवान खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आणि पुमसे खेळ प्रकारात भारतीय संघाला रौप्यपदकाचा बहुमान मिळवून दिला. या स्पर्धेतील क्योरूगी प्रकारात रुदाली बरुआ हिने 73 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळविले. दहा वर्षापूर्वी लतिका भंडारी हिने या प्रकारात कांस्यपदक मिळविले होते.
भारतीय संघातील खेळाडूंनी अथक परिश्रमातून हे ऐतिहासिक पदक मिळवले आहे. यामुळे हे इतिहास रचणारे पदक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. तसेच रुदाली हिचे पदकही अभिमानास्पद आणि अपेक्षा उंचावणारे आहे.
– नामदेव शिरगावकर,अध्यक्ष, राज्य तायकांदो संघटना
कामगिरी अतुलनीय
ज्या प्रकारात रूपा व रुदाली यांनी पदके जिंकली, त्या क्रीडा प्रकारांच्या लढती आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही आयोजित केल्या जातात. ही गोष्ट लक्षात घेतली तर या दोन्ही खेळाडूंची कामगिरी अतुलनीय आणि अन्य युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणारी आहे.