इजिप्त हिंदला चाळीस कोटींचे क्रूड तेल पुरविणार
नवी दिल्ली, दि. 19 – आज भारत व इजिप्त यांच्यात झालेल्या एका व्यापार करारानुसार इजिप्त भारताला 40 कोटी रुपयांचे क्रूड तेल पुरविणार आहे. इजिप्तने भारताला क्रूड तेल पुरविण्याची ही पहिलीच वेळ असेल. या करारानुसार भारत-इजिप्त व्यापार दरवर्षी 60 टक्क्यांनी वाढणार आहे.
इजिप्त भारताला तांदूळ, रॉकेल, फॉस्फेट आणि लांब धाग्याचा कापूसही पुरविणार आहे. भारतातून इजिप्तला लोखंड व पोलादी माल निर्यात करण्यात येईल, त्याची किंमत 20 कोटी रुपये असेल. यामुळे दोन देशांत सहकार्य भावना रुजेल.
उद्योगपतींनी केवळ नफ्याची दृष्टी ठेवू नये
मुंबई – केवळ नफा मिळविण्याची दृष्टी न ठेवता देशाचा कायापालट कसा होईल याकडे उद्योगपतींनी लक्ष द्यावे असे प्रतिपादन नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष पी. एन. हक्सर यांनी केले. ते पुढे म्हणाले, व्यापारी जेव्हा उद्योगपती बनतात तेव्हा ते केवळ व्यापाऱ्यांचाच विचार करतात. त्यामुळे त्यांचे उद्योगधंदे आजारी होतात.
विचारवंतांचा पुढाकार गरजेचा
पुणे – विचारवंतांनी व सुशिक्षितांनी पुढे येऊन आपल्या संपूर्ण शक्तीनिशी कुटुंब नियोजनाच्या कार्यात पुढाकार घेतला पाहिजे. त्याशिवाय या आत्यंतिक महत्त्वाच्या कार्यात प्रगती होऊ शकणार नाही, असे आरोग्यमंत्री प्रतिभाताई पाटील म्हणाल्या.