नवी दिल्ली – जगजीवनराम व इतर पाच कॉंग्रेस नेत्यांनी “लोकशाहीसाठी कॉंग्रेस’ (कॉंग्रेस फॉर डेमॉक्रसी) ही संघटना स्थापन केली आहे. ही कसोटीची वेळ असून, राष्ट्रापुढे लोकशाहीचे रक्षण हे महत्त्वाचे काम आहे. राष्ट्रीय जीवनातील अनेक क्षेत्रातील “अवैध व अनैतिकपणा’ दूर करण्यासाठी व धोरणांच्या उलट दिशेने चाललेली वाटचाल टाळण्यासाठी मार्चमधील निवडणुका ही संधी असल्याचे जगजीवनराम म्हणाले.
16 मार्चला मतदानास प्रारंभ
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचे मतदान 16, 18, 19 व 20 मार्च रोजी होईल, असे निवडणूक आयोगाने घोषित केले. 23 मार्च रोजी सर्व मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर होतील.
पोलीस व सरकारी यंत्रणेस सहकार्य द्या
मुंबई- राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच मोकळ्या वातावरणात निवडणुका होण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पोलीस व इतर सरकारी यंत्रणेशी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केले आहे. हिंसाचार, सभा उधळणे, भडक किंवा जातीय घोषणा टाळाव्यात. शक्य तोवर वैयक्तिक टीका होऊ देऊ नका.
इजिप्तला फ्रान्सकडून लढाऊ विमाने
पॅरिस – इजिप्त व अन्य अरब देशांना मिराज एफ1 जातीची 200 लढाऊ विमाने देण्याचे फ्रान्सने कबूल केले आहे. ही विमाने अद्ययावत स्वरूपाची असून आवाजापेक्षा दुप्पट वेगाने आकाशात उड्डाण करू शकतात.