शस्त्रनिर्यातीमुळे जगात तणाव वाढतात
वॉशिंग्टन, दि. 2 – अमेरिकन सिनेटर विल्यम प्रॉक्समायर यांनी अमेरिकन सरकारच्या शस्त्र निर्यातीवर टीका केली आहे. शस्त्र निर्यातीबाबत अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो. युद्धमान राष्ट्रांना शस्त्र संपन्न करण्यापेक्षा शस्त्र स्पर्धाविरहित टापू निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः आफ्रिका, दक्षिण अमेरिका, इंडोचायना भागात शस्त्रांच्या साधनांचा अभाव निर्माण करून तणाव कमी केला पाहिजे.
शास्त्रज्ञांनी देवघेव केली पाहिजे
मद्रास – विषमता व दारिद्य्र नष्ट करावयाचे असेल तर शास्त्रज्ञान व तंत्रज्ञान यांची देवघेव करण्यात आली पाहिजे व त्याचवेळी गुप्तता काढून टाकली पाहिजे, असे विचार अणुसंशोधन मंडळाचे डॉ. सेठना यांनी व्यक्त केले.
रॉकेलची कृत्रिम टंचाई
पुणे – शहरातील काही दुकानांतून नागरिकांना रॉकेल देण्यास दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी असून काही दुकानांपुढे नागरिकांच्या रॉकेल मिळविण्यासाठी रांगा लागल्या होत्या. रॉकेल टंचाई नसूनही दुकानदारांनी रॉकेल नसल्याचे बोर्ड अनेक ठिकाणी लावल्याचेही दिसते. शहराच्या काही भागांत नागरिकांना रेशन कार्डावर रॉकेल आले. त्यातही नफ्याचे प्रमाण कमी असल्याने अनेक दुकानदार रॉकेल आणण्यास दिरंगाई करतात. म्हणून त्या विभागात अशी कृत्रिम टंचाई भासते.
वीजकपातीत सवलत
मुंबई – मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत असे जाहीर केले की, वीजकपातीच्या धोरणात कारखाने, छापखाने, दुकाने, हॉटेल्स व रेस्टॉरंट यांना थोडी सवलत देण्यात येईल. वीजकपातीच्या चालू धोरणामुळे उत्पादन व नोकऱ्या यावर अनिष्ट परिणाम झाला आहे.