40 लाख वाहने अन्‌ 49 ई-पीयूसी केंद्र

अपुऱ्या यंत्रणेवर शहराचा डोलारा


तरीही घरबसल्या समजणार केंद्र

पुणे – वाहनांच्या प्रदूषण तपासणीसाठी असणारी “पीयूसी’ अर्थात “पोल्युशन अंडर कंट्रोल’ तपासणी यंत्रणा केंद्र शासनाच्या आदेशानुसार अद्ययावत झाली. मात्र, सध्या शहरामध्ये केवळ 49 “ई-पीयूसी केंद्रे’ सुरू झाली आहेत. शहरांतील वाहनांची संख्या 40 लाखांपर्यंत पोहोचली आहे.

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहराच्या प्रदूषण पातळीतदेखील वाढ होत आहे. त्यामुळे वाहनांची “पीयूसी’ तपासणे आवश्‍यक आहे. मात्र, सध्याच्या वाहनांच्या संख्येच्या तुलनेत असणारी “ई-पीयूसी’ केंद्रांची संख्या अपुरी असल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व पीयूसी केंद्र अद्ययावत करण्यात आली. दि. 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी देखील झाली. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने याबाबत सूचनादेखील दिल्या होत्या. मात्र, याविरोधात केंद्रचालक न्यायालयात गेल्याने काही महिने हा निर्णय प्रलंबित होता. परंतु, न्यायालयाने केंद्रचालकांच्या मागण्या अमान्य केल्या होत्या. त्यामुळे अधिकाधिक केंद्रे सुरू करण्याच्या सूचना परिवहन कार्यालयाने दिल्या आहेत. शहरांतील ई-पीयूसी केंद्रांची माहिती परिवहन विभागाच्या “परिवहन’ या संकेतस्थळावर “अपडेट’ करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या जवळपासच्या परिसरांतील केंद्रांची माहिती घरबसल्या समजणार आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी या प्रवर्गांचा समावेश आहे. या संकेतस्थळावर केंद्राचे नाव, पत्ता, वाहनाचा वर्ग, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी पाहता येणार आहे.

प्रदूषणाची पातळी नियंत्रित आहे, की नाही यासाठी पीयूसी तपासणी केली जाते. या चाचणीमुळे कार्बन मोनॉक्‍साइड आणि हायड्रोकार्बनचे प्रमाण तपासले जाते. यापूर्वी ही प्रक्रिया मॅन्युअली करण्यात येत होती. मात्र, नव्या नियमानुसार ही यंत्रणा ऑनलाइन झाल्याने पीयूसीबाबतच्या गैरप्रकाराला आळा बसणार आहे. याचबरोबर “मॅन्युअली’ दिले जाणारे प्रमाणपत्र यापुढील काळात अवैध ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी “मॅन्युअल’ प्रमाणपत्र स्वीकारू नये, असे आवाहन आरटीओने केले आहे.

अशी आहे नोंदणी प्रक्रिया
परिवहन (संकेतस्थळ) – ऑनलाइन सर्व्हिसेस – “पीयूसीसी’ – “पीयूसी सेंटर लिस्ट’ – महाराष्ट्र पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.