‘अलमट्टी’तून 4 लाख 50 हजार क्‍युसेक विसर्ग

पूरस्थिती नियंत्रणात : अजूनही 47 गावे पाण्याने वेढलेली

पुणे – मागील चोवीस तासांत पुणे विभागात महाबळेश्‍वर परिसर वगळता कोणत्याही धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली नाही. तर दुसरीकडे कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून 4 लाख 50 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र, अजूनही 47 गावे पुराच्या पाण्याने वेढलेले असून, बोट किंवा हवाई मार्गानेच त्यांच्याशी संपर्क केला जात आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागातील पूरस्थितीसह बचाव व मदत कार्याची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्‍त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते.

यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, विभागात आतापर्यंत सरासरी 143 टक्‍के पाऊस झाला असून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांत येत्या 48 तासांत हवामान विभागाच्यावतीने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, गेल्या चोवीस तासांत महाबळेश्‍वर वगळता कोणत्याही धरण क्षेत्रात अतिवृष्टी झालेली नाही. त्यामुळे कोयना धरणासह इतर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तसेच कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून 4 लाख 50 हजार क्‍युसेक इतक्‍या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र, येरळा नदीच्या क्षेत्रात पाऊस पडल्याने या नदीला पूर आला असून कृष्णेसह इतर नद्यांच्या पाण्यामुळे अलमट्टी धरणात 3 लाख 80 हजार क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पाणी पातळी 2 फुटांनी तर सांगलीतील पाणी पातळी 3 इंचांनी कमी झाली आहे. पावसाची स्थिती सामान्य राहिल्यास पाणी ओसरायला सुरुवात होणार आहे. मात्र, यापुढे पाऊस न झाल्यास परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा विश्‍वास डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्‍त केला.

पुराचे पाणी ओसरायला सुरुवात
पुरामुळे संपर्क तुटलेल्या गावांतील सर्व नागरिकांना एकाचवेळी मदत करणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे आजारी व ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जात असून, पुराचे पाणी ओसरायला लागले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सांगली जिल्ह्यातील भिलवडी आणि सांगलवाडी येथे पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जेवणाची पाकिटे व पाणी पुरविण्यात आले असून हेलिकॉप्टरद्वारे त्यांची सुटका केली जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)