तेहरान – इस्रायलच्या ४ गुप्तहेरांना इराणमध्ये फाशी देण्यात आले आहे. आज पहाटेच्या सुमारा इस्रायलच्या ४ दहशतवाद्यांना मृत्यूदंड देण्यात आल्याचे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या चौघांवर इराणमधील कुर्दिस्तान प्रांतातून इराणच्या हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याचा आणि इसफाहन प्रांतातील फॅक्टरीमध्ये बॉम्बस्फोट घडवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
इस्रायलच्या बाजूने हेरगिरीसाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांना गेल्या वर्षी १८ सप्टेंबर रोजी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. याशिवाय इराणमधील सुरक्षा दोक्यात आणण्याच्या उद्देशाने दहशतवादी गट स्थापन करणे आणि या गटांचे व्यवस्थापन बघण्याच्या आरोपातही त्यांना दोषी ठरवण्यात आले होते.
कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाचा फेरविचार करण्यासाठी वरिष्ठ न्यायालयात आव्हान याचिका दाखल झाली होती. पण तेथेही या आरोपींच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर ही फाशी देण्यात आली.