मंचर : दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या तीन जागांसाठी तालुक्यातील विविध गावातील 14 केद्रांवर रविवारी (दि. 16) 38.62 टक्के मतदान झाले. कारखान्याचे संस्थापक माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निरगुडसर येथे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी मंचर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (दि. 17) मतमोजणी मंचर क्रीडा संकुल येथे होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची स्थगित झालेली निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी (दि. 7) एकूण 21 जागांसाठी जाहीर झाली होती. दरम्यान, 18 जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर शिंगवे रांजणी मतदारसंघातील तीन जागांसाठी 4 उमेदवार उभे राहिले. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवार देवदत्त निकम, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर आणि अपक्ष उमेदवार तुकाराम गावडे हे उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सील झाले आहे.
कारखान्याचे संस्थापक माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निरगुडसर येथे, अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी मंचर, कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि उमेदवार देवदत्त निकम यांनी रांजणी, संचालक आणि उमेदवार बाबासाहेब खालकर आणि दादाभाऊ पोखरकर आणि अपक्ष उमेदवार तुकाराम गावडे यांनी भराडी येथे मतदानाचा हक्क बजावला आहे.
दरम्यान, भीमाशंकर कारखान्याची निवडणूक ही औपचारिक ठरली होती. मात्र, तीन जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत फारसा उत्साह दिसून आला नाही. मतदानांचा टक्का घसरल्याचे आकडेवारीवरून दिसून आले.
4523 मतदारांनी बजावला हक्क
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे एकूण मतदार 12711 आहे. त्यापैकी सुमारे 4523 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुमारे 38.62 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली.