पुणे, दि. 16 -गेले तीन महिने राजकीय अस्थिरता, राज्यातील सत्तापालट आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्तीअभावी जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊ शकली नव्हती. आता या समितीची पहिलीच बैठक पालकमंत्री चंदकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (दि. 17) होत आहे. यात अजित पवार पालकमंत्री असताना मंजूर केलेल्या निधीत फेरबदल केले जाण्याची शक्यता असून, त्यामुळे बैठक वादळी होण्याची चिन्हे आहेत.
राज्यात तीन महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर या सरकराने महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर टीका केली होती. जुन्या सरकारने त्यांच्या पक्षातील आमदारांनी सूचविलेल्या विकासकामासाठी सर्वाधिक निधी मंजूर केल्याचा आरोप नव्या सरकारने करीत पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
जिल्ह्यातील विकासकामांना सर्वाधिक निधी जिल्हा नियोजन समितीकडून मिळतो. स्थगितीच्या निर्णयामुळे पुणे जिल्हा परिषदेतील अनेक विकासकामे रखडली आहेत. निधीअभावी काही विकासकामास सुरुवात झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार पालकमंत्री असताना त्यांनी सुमारे 725 कोटी रुपयांच्या जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्याला मंजुरी दिली होती. प्रशासनाने या आराखड्याची कार्यवाहीही सुरू केली होती. आता मात्र सत्तांतरानंतर पूर्वीच्या विकासकामांत फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरून जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यात नव्या पालकमंत्र्यांकडून सत्ताधारी पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी सूचविलेल्या कामांस प्राधान्य दिले जाणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
सध्याचे पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी (दि. 15) प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन समितीच्या आराखड्याचा आढावा घेतला. उद्या (दि. 17) दुपारी एक वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सध्या जिल्हा नियोजन समितीचा एकही सदस्य अस्तित्वात नाही. सर्व जागा रिक्त आहेत. त्यामुळे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे पालकमंत्र्यांना असणार आहेत.
दोन्ही “दादा’ आमने-सामने
नव्या पालकमंत्र्यांची नेमणूक झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक होत असून, यापूर्वी मंजूर केलेल्या किती आणि कोणत्या कामांना कात्री लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या बैठकीत आमदार म्हणून अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही “दादां’च्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत कोणते राजकीय रंग उधळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.