पुणे – देशात करोनाच्या परिस्थितीत जुलै 2020 मध्ये नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू झाला. नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार आठ महिन्याच्या कालावधीत (फेब्रुवारी 2021 अखेर) पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये 366 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये आयोगाचे कामकाज बंद होते. त्यामुळे ग्राहकांना तक्रार दाखल करणे शक्य झाले नाही. तरी नागरिकांनी ऑनलाइन तक्रारी दाखल केल्या आहेत. फेब्रुवारी 2021 अखेर 1925 केसेस प्रलंबित आहेत.
करोना काळात दहा महिने इतर न्यायालयीन कामकाजाप्रमाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कामकाज बंद होते. मात्र त्यानंतरच्या काळात एका सत्रामध्ये आयोगाचे काम सुरू करण्यात आले असले तरी अतिमहत्वाच्या दाव्यांना प्राधान्य देण्यात आले. दरम्यान, 20 जुलै 2020 मध्ये नवीन
ग्राहक संरक्षण कायदा लागू झाला. तब्बल 38 वर्षांनी कायद्यात बदल करण्यात आले आहेत. या नवीन कायद्यामध्ये ऑनलाइन खरेदीबाबत ई-कॉमर्स अंतर्गत विशेष तरतूद करण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळामध्ये घराबाहेर पडता येणे शक्य न झाल्यामुळे अनेकांनी ऑनलाइन खरेदीचा पर्याय स्वीकारला. मात्र अनेक नागरिकांना फसवणुकीचे अनुभव आल्याने त्यासंदर्भातील तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण देखील वाढले. गतवर्षी सप्टेंबर मध्ये 54 तर ऑक्टोबर मध्ये 60 आणि त्यानंतर जानेवारीमध्ये 67 तक्रार अर्ज दाखल झाले. 2020 मध्ये मिळून एकुण 401 दावे दाखल झाले आहेत.