प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न
पिंपरी – घरगुती विलगीकरणात राहणाऱ्या करोनाबाधितांमुळे अन्य नागरिकांना करोनाची लागण होऊ नये, या दृष्टीने महापालिका प्रशासनाने मंगळवारी (दि. 16) महत्त्वाची पावले उचलली. घरगुती विलगीकरणातील करोनाबाधित नागरिकांच्या हातावर घरगुती विलगीकरणाचा शिक्का मारण्यात येणार असून घरावर/दरवाज्यावर 14 दिवसांसाठी फलक लावण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
घरगुती विलगीकरणातील रुग्णांची संख्या शहरात पाच हजारांहून अधिक आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे आढळून येत नाहीत. या रुग्णांनी जर पुरेशी दक्षता न घेतल्यास ते करोनाचे “सुपरस्प्रेडर’ ठरू शकतात. ही बाब लक्षात घेऊन आदेश काढण्यात आले आहेत. घरगुती विलगीकरणातील करोनाबाधित व्यक्तींची माहिती जवळच्या आरोग्य केंद्रास देणे आवश्यक राहील. तसेच, त्यांच्यावर कोणत्या डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत, याबाबतची माहिती देखील द्यावी लागेल.
कोवीड-19 ने बाधित व्यक्तीच्या घरातील इतर सदस्यांच्या हालचालीवर मर्यादा राहतील. तसेच, त्यांना मास्क वापरणे बंधनकारक असेल. या नियमांचे पालन न केल्यास कोविड बाधित व्यक्तींना महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येईल. कोविडबाबतच्या आदेशाचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंड संहितेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील सिनेमागृह, हॉटेल, उपहारगृह, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. मात्र, त्यासाठी विविध अटी लागू करण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापना कोविड 19 हा साथीचा रोग आपत्ती म्हणून घोषित केले आहे त्या कालावधीपर्यंत बंद करण्यात येईल. तसेच, त्यांच्या मालकाविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शॉपींग मॉल्सला देखील विविध अटींवर परवानगी दिली आहे.
आयुक्तांच्या आदेशातील ठळक मुद्दे :
– आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवांशिवाय सर्व कार्यालये 50 टक्के मनुष्यबळासह सुरू ठेवता येणार.
– दुकानांची गल्ली व पार्किंगची जागा कमी असल्यास किंवा रस्ता लहान असल्यास सम-विषम तारखेनुसार दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा.
– दुकाने असलेल्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था व रस्त्याची रुंदी जास्त असल्यास ही दुकाने एकाआड एक बंद ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा.