इमॅन्युअल बोन घेणार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट
नवी दिल्ली – फ्रान्स भारताबरोबर राफेल फायटर विमान विक्रीचा नवीन करार करण्यासाठी इच्छुक असून भारताला आणखी 36 राफेल फायटर विमानांची विक्री करण्याचा फ्रान्स गांभीर्याने विचार करत आहे. राफेल बरोबरच फ्रान्सला भारताबरोबर हेलिकॉप्टर्स, पाणबुडयांचा विक्री करार करायचा आहे.
या संदर्भात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युअल बोन आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत. त्या करारातंर्गत पहिले राफेल विमान भारताला पुढच्या महिन्यात मिळणार आहे. नुकतीच जी 7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली होती.
त्यानंतर दोन्ही देशांमध्ये एनएसए स्तरावरची उच्चस्तरीय बैठक होत आहे. राफेल विमाने स्वीकारण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सप्टेंबर महिन्यात फ्रान्सला जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवडयात फ्रान्स भारताला पहिले राफेल विमान सुपूर्द करणार आहे. भारताने फ्रान्सबरोबर 36 राफेल विमानांच्या खरेदीचा करार केला आहे. पुढचे काही महिने भारतीय वैमानिकांना फ्रान्समध्ये राफेल विमान उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.