शिरवळ – खंडाळा तालुक्यात करोनाचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे. तालुक्यात दोन दिवसांत 35 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने तालुक्यात करोनाबाधितांची संख्या 286 वर पोहचली आहे. त्यामुळे खंडाळा तालुका त्रिशतकाच्या घरात पोहचला असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 114 जण अद्यापही उपचार घेत आहेत.
खंडाळा तालुक्यातील करोनाचा “हॉट स्पॉट’ ठरलेल्या शिरवळ शहरासह जवळच्या विंग, जवळे गावातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कालच्या एका दिवसात खंडाळा तालुक्यातील जवळे येथील 20 वर्षाची महिला, 15 वर्षाचा युवक, पाडेगाव येथील 38, 70, 60 वर्षीय महिला, विंग येथील 55, 70, 36, 26, 26 वर्षीय महिला, 65, 52, 25 वर्षीय पुरुष, बालाजी विश्व, शिरवळ येथील 26 वर्षीय पुरुष, पळशी येथील तीन वर्षाची बालिका, जवळे येथील 38, 48 वर्षाची महिला, स्टार सिटी, शिरवळ येथील 42 वर्षाची महिला, पाडेगाव येथील 48 वर्षाचा पुरुष, खंडाळा येथील 64 वर्षाचा पुरुष यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत तर लोणंद येथील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या खंडाळा शहरातही रुग्णांची संख्या 18 झाली असून शहरातील रस्ते सील करण्यात आले आहेत. करोनाच्या वाढत्या कहरामुळे गेल्या एक महिन्यापासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर असलेल्या शिरवळमधील व्यापाऱ्यांनी शिरवळला प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शिथिलता आणत व्यवसाय सुरु करण्याबाबतचे आदेश द्यावेत, अशा मागणीबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना शिरवळ व्यापारी महासंघाच्या माध्यमातून ई-मेलद्वारे पाठवले आहे. मात्र, याबाबत कोणताही निर्णय प्रशासनाकडून आलेला नाही. एक महिन्यापासून बंद असलेल्या व्यवसायामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरु असून प्रतिबंधित क्षेत्रामध्ये असल्यामुळे कंपनीसह विविध आस्थापनांमध्ये कार्यरत नागरिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.