तळेगाव ढमढेरे – परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला आज अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. या बिबट्याने तळेगाव ढमढेरे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून आपले भक्ष्य केले होते. त्यामुळे सायंकाळी घराच्या बाहेर पडताना किंवा शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणी देण्यासाठी रानात जाताना बिबट्याची परिसरात मोठी दहशत असल्याने शेतकरी व नागरिक बाहेर पडण्यास घाबरत होते.
तळेगाव ढमढेरे येथील चौधरी वस्ती,ढमढेरे वस्ती,भिमाशेत,साळूमाळी वस्ती परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार संचार नागरिकांना पाहायला मिळत होता. दैनिक प्रभातने याबाबत ‘धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला’, ‘तळेगाव ढमढेरेत बिबट्याचा थरार’, अशा आशयाच्या वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत शिरूर वनविभागाच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथील ढमढेरे वस्ती येथे बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता.
पंधरा दिवस उलटूनही बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्याने नवीन उपाययोजना करावी, यासाठी दैनिक प्रभातने तळेगाव ढमढेरेचा बिबट्याच्या प्रतीक्षेत अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर पिंजरा पहिल्या जागेपासून काहीशा अंतरावर स्थलांतर केल्यानंतर पहिल्याच रात्री बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला व नागरिकांचा भीतीने गुदमरलेला श्वास मोकळा झाला.
शिरूरचे वनधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सोमनाथ पाटील, वनरेस्क्यू टीम सदस्य गणेश टिळेकर, वनकर्मचारी बाबासो घोलप यांनी कार्यवाही केली तर अमोल ढमढेरे, संतोष ढमढेरे, वैभव ढमढेरे, रामभाऊ ढमढेरे, भाऊ सोनवणे, सार्थक ढमढेरे, योगेश सोनवणे, तुषार ढमढेरे, अक्षय ढमढेरे आदित्य ढमढेरे, पिंजरा लावण्यापासून ते स्थलांतर करण्यापर्यंत यांनी अथक प्रयत्न केले. तर परिसरात अजून एका बिबट्याचा वावर आहे. वनविभागाने आपली कार्यवाही न थांबवता ती सुरु ठेवावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली.