पुणे –पुणे रेल्वेस्थानकासाठी 31 कोटी आणि हडपसर रेल्वेस्थानकासाठी 21 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे. मागील वर्षीपेक्षा दोन्ही कामांसाठी यंदा झालेली तरतूद दुप्पट आहे. रेल्वे मार्ग विस्ताराच्या अनुषंगाने निराशाजनक बाब असली तरी देखील रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी “बुस्टर’ मिळाला आहे.
अर्थसंकल्पात मध्यरेल्वेसाठी केलेल्या आर्थिक तरतुदींचा उल्लेख असणारे “पिंक बुक’ गुरूवारी जाहीर झाले. यात नवीन मार्गिका, दुहेरीकरण, स्थानकांचा विकास, प्रवासी सुविधा आदींसाठी आर्थिक तरतूद केली आहे. यंदा मध्यरेल्वेने विविध योजनांसाठी 7 हजार 251 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मध्यरेल्वे अंतर्गत 2022-23 या वर्षातील निधीच्या तरतुदींपैकी प्रामुख्याने नव्या मार्गिकांसाठी 1 हजार 455 कोटी रुपये, दुहेरीकरण आणि तिसऱ्या, चौथ्या मार्गिकांसाठी 3 हजार 628 कोटी रुपये, पादचारी पुलांसाठी 60.67 कोटी रुपये अशी तरतूद आहे.
नवीन मार्गिकांसाठी तरतूद…
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा- नांदेड, सोलापूर- उस्मानाबाद, धुळे – नरडाणा, कल्याण-मुरबाड या मध्यरेल्वेच्या नविन मार्गिकांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. मात्र, पुणे विभागात नविन मार्गिकेसाठी तरतूद केलेली नसून, पुणे-लोणावळा तिसरी आणि चौथी मार्गिका देखील रखडली आहे.
हडपसरला 21 कोटी रुपये…
हडपसर स्थानकाचे संपूर्ण काम 2024 पर्यंत होणे अपेक्षित आहे. पायाभूत सुविधा उभारणे वज्ञश निधी अभावी रखडले होते. यंदा हडपसर स्थानकाच्या विकासासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील वर्षी 8 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यामुळे प्रवासी सुविधा उभारणे शक्य होणार आहे.
फलाट विस्तारासाठी 31 कोटी
पुणे रेल्वे स्थानकावर 24 आणि 26 कोचेसची रेल्वे उभी करता यावी, या उद्देशाने पुणे स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे प्रस्तावित आहे. या महत्त्वपूर्ण कामासाठी यंदा यासाठी 31 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, मागील वर्षी 13 कोटी रुपयांची तरतूद केली होती.
यासाठी तरतूद…
पुणे-मिरज-लोंढा मार्गिका दुहेरीकरण – 1 हजार 567 कोटी
दौंड- मनमाड मार्गिका दुहेरीकरण – 500 कोटी
रेल्वे क्रॉसिंग इंटरलॉकिंग – 1 कोटी 70 लाख