पुणे -शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांत शुक्रवारी हलक्या सरी पडल्या. तर, काही ठिकाणी दिवसभर भुरभूर सुरू होती. पुण्यात 3 मिमी पावसाची नोंद झाली. मागील 24 तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोव्यात पुढील चार दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर, घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर, काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शनिवारी आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी/सायंकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
18 आणि 19 जुलै रोजी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची आणि मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे. तर, घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
शुक्रवारी शहराच्या काही भागात ऊन होते. तर काही भागात पावसाचा शिडकावा झाला. शहरात शिवाजीनगर येथे 3 मिमी, लोहगाव 2 मिमी आणि पाषाण येथे 0.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.