पलक्कड – केरळमध्ये विषारी दारू पिऊन तीन जणांचा बळी गेला आहे. ही दारू पिऊन अन्य नऊ जण अत्यवस्थ झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात तीन महिलांचाही समावेश आहे. पलक्कड जवळील कंजीकोडे या अदिवासी भागात हा प्रकार घडला.
काल रात्री तेथील रहिवाशांनी स्थानिक गुत्त्यामधून ही दारू विकत घेऊन ती प्राशन केली होती. कालच तिथे दोन जण मरण पावले तर तिसरा आज सकाळी मरण पावला. अन्य नऊ जणांवर उपचार सुरू असले तरी त्यातील काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, या नागरिकांनी नक्की दारूच प्यायली होती की अन्य कोणते वेगळे रसायन प्यायले होते याचा पोलीस शोध घेत आहेत. मृतांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच आम्हाला याची नेमकी माहिती मिळू शकेल, असे वरिष्ठ पोलिसांनी सांगितले. दारूमध्ये त्यांनी सॅनिटायझर मिसळल्याने हा प्रकार झाला असावा, असे काहींचे म्हणणे आहे.