कराची – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे अकार्यक्षम आणि अनभिज्ञ आहेत, त्यांना देशापुढील समस्यांची कोणतीच जाण नाही, अशी टीका तेथील विरोधी पक्षांनी केली आहे.
इम्रान खान यांच्या विरोधात देशातील 11 प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट नावाची एक स्वतंत्र आघाडी उघडली आहे. त्या आघाडीच्या नेत्यांची आज येथे एक बैठक झाली त्यात या सरकारला सत्तेवरून घालवून देण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला.
सरकारच्या विरोधातील आंदोलनांची आखणीही यावेळी करण्यात आली असून आता या सरकारच्या विरोधात देशभर निदर्शने, मोर्चे आणि सभांचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात इस्लामाबादला एक लॉंग मार्च काढला जाणार आहे. हा मार्च निर्णायक असेल आणि सरकार उलथवून टाकण्याचा निर्धार यातून व्यक्त केला जाईल, असेही या आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले की, इम्रान खान यांना सरकार चालवणे जमलेले नाही, त्यामुळे त्यांच्यापुढे घरी जाण्याखेरीज कोणताही पर्याय उरलेला नाही. जगात कोणताही हुकूमशहा फार काळ टिकलेला नाही हा इतिहास आहे. इम्रान खान हे तर कळसुत्री बाहुुले आहेत त्यांना पदावर राहण्याचा काय अधिकार आहे, असा सवालही त्यांनी
केला आहे. नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज, शाहीदखान अब्बासी, मेहमुद अचकाझी, या नेत्यांसह आघाडीचे प्रमुख मौलाना फजलूर रहमान हेही यावेळी उपस्थित होते.