290 विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात

– डॉ.राजू गुरव

पुणे – विश्रांतवाडी-येरवडा परिसरातील झोपडपट्ट्यांमधील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे तसेच त्यांना भविष्यात यशाचे उंच शिखर गाठता यावे यासाठी महात्मा गांधी शाळेत अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. सध्या या शाळेत नर्सरी ते चौथीपर्यंतच्या वर्गात तब्बल 290 विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत.

आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने बहुसंख्य मुलांना शिक्षण घेता येत नाही. या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जीवन मित्र प्रतिष्ठान व चॅरिटेबल ट्रस्टने येरवडा येथील संजय पार्कमध्ये सन 2014 मध्ये महात्मा गांधी ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. ही खासगी शाळा कायम विनाअनुदानित तत्त्वावर चार गुंठ्याच्या भाड्याच्या जागेत चालविली जाते. शाळेच्या स्थापनेच्या पहिल्या वर्षी नर्सरी व एलकेजी या वर्गात 46 विद्यार्थी संख्या होती. ही संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी 21 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेत कार्यरत आहेत. संगणक कक्ष, ग्रंथालयासह इतर सुविधांनी शाळा सज्ज ठेवली आहे. विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, गणवेश, बॅग्ज, बूट व विविध खाद्यपदार्थ वाटप करण्यात येतात. नागरिकांच्या आर्थिक सहकार्यातूनही ही शाळा चालविली जात आहे. विद्यार्थ्यांकडून एक रुपयाही फी घेतली जात नाही. येत्या 1 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी व पुन्हा घरी सोडण्यासाठी स्कूलबस, व्हॅन, रिक्षांची मोफत वाहतूक सुविधाही पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती शाळेचे संस्थापक अध्यक्ष विनायक देवकर यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार
भविष्यात इयत्ता दहावीपर्यंत शाळेचे वर्ग वाढवून शाळेतील एकूण विद्यार्थीसंख्या 1,500 पर्यंत नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन पातळीवरील शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रांत नोकरी मिळवावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शाळा सतत पुढाकार घेत असून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक विविध उपक्रम सतत राबविण्यात येत असतात. विद्यार्थ्यांना योगाचे धडेही देण्यात येतात. त्यांच्या आनंदासाठी सहलींचे आयोजनही करण्यात येत असते. दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांना नवीन कपडे, मिठाई यांचे वाटप करण्यात येते. त्यांच्या पालकांनाही विविध कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.