‘पीव्हीपीआयटी’चे सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रांतही उल्लेखनीय कार्य

– व्यंकटेश भोळा

पुणे – बावधन येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (पीव्हीपीआयटी) या महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करून आपला वेगळा ठसा निर्माण करण्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी महाविद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांच्या आयोजनावर भर देण्यात येत असतो. विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने, कार्यशाळा, प्रदर्शन हे उपक्रम घेण्यात येत असतात. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कोणते ना कोणते तरी कला गुण असतात. या गुणांचा विचार करून विद्यार्थ्यांना शिक्षणाव्यतिरिक्‍त इतर क्षेत्रांत विकास करण्यासाठी विविध माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात येत असते. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शनही करण्यात येत असते. यातून विद्यार्थ्यांनी उत्तम काम करून महाविद्यालयाच्या यशात सतत भर टाकण्याकडेच वाटचाल ठेवली आहे. संस्थेचे संचालक एस. आर. थिटे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याला प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सतत पुढाकार घेण्यात येत असतो.

“स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत पुणे महापालिकेच्या “स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाअंतर्गत कुटुंब, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक संस्था यांच्यासाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानात “पीव्हीपीआयटी’ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी या सर्वांनी सामूहिकपणे उत्तम कामगिरी केली. याबद्दल महापौर मुक्‍ता टिळक यांच्या हस्ते महाविद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले आहे.

चमकदार कामगिरीची परंपरा कायम
महाराष्ट्रात कला क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेत “द फादर ऑफ 669′ या प्रयोगाद्वारे महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी खूप कष्ट घेतले. जिद्द, चिकाटी कायम ठेवत उत्तम प्रयोग सादर केला. या प्रयोगाने एकूण 15 बक्षिसे पटकावली. यामुळे महाविद्यालयाचे नाव आणखीन उज्ज्वल होण्यास मदत झाली आहे. विद्यार्थ्यांना विविध स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नेहमी मोकळीक दिली जात. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरीची परंपरा कायम ठेवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.