पुणे – शहरात करोनाचा महामारीत मृत्यूचा कहर सुरूच असून, शुक्रवारी दिवसभरात 29 जणांचा मृत्यूची नोंद झाली. तर अत्यवस्थ बाधितांची संख्या साडेपाचशेवरून तब्बल 663 वर पोहोचली आहे. त्यामध्ये 102 बाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.24) शहरात नव्याने 1 हजार 479 बाधित सापडले आहेत. तर बाधितांची एकूण संख्या 45 हजार 544 वर पोहोचली आहे.
दोन दिवसांपासून शहरातील बाधितांची संख्या शंभर ते दोनशेने कमी होताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभरात 5 हजार 747 संशयितांची तपासणी करण्यात आली. अत्यवस्थ बाधित संख्येने साडेसहाशेच्या पुढे मजल मारली आहे. त्यामध्ये 102 बाधितांना व्हेंटिलेटरवर, तर 561 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या 17 हजार 686 बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर 817 बाधित ठणठणीत बरे झाले आहेत. त्यामुळे घरी गेलेल्यांची संख्या 26 हजार 725 वर पोहोचली आहे. तर 23 हजार 345 संशयीत व्यक्तींना क्वारंटाइन केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.